‘कुमार महाराष्ट्र केसरी’चा व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

जिममध्ये व्यायाम करीत असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ‘कुमार महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान’ विक्रम पारखीचा (30) दुर्दैवी मृत्यू झाला. कुस्तीतील अनेक किताब पटकावलेल्या पैलवान विक्रमवर नियतीने अचानक घाला घातल्याने संपूर्ण मुळशी तालुक्यावर शोककळा पसरली आहे. पैलवान विक्रमचे येत्या 12 डिसेंबरला लग्न होणार होते, मात्र त्याच्या अकस्मात मृत्यूमुळे कुटुंबीयांसह मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हिंजवडीतील गोल्ड्स जिममध्ये विक्रम नियमित व्यायाम करायचा. बुधवारीही तो सकाळी तो नेहमीप्रमाणे जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेला होता. व्यायाम करीत असताना सकाळी साडेआठच्या सुमारास विक्रम अचानक चक्कर येऊन खाली कोसळला. त्याला त्वरित लगतच्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

मुळशीतल्या माणगावचा सुपुत्र असलेल्या विक्रम पारखीने ‘कुमार महाराष्ट्र केसरी’ पदावर आपले नाव कोरून मानाची गदा मिळवली होती. 28 नोव्हेंबर 2014 रोजी वारजे येथे आयोजित ‘महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत’ विक्रमने अजिंक्यपद मिळवले होते. झारखंड येथील रांचीमध्ये झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतही त्याने कांस्य जिंकले होते. मुळशीतील माले केसरी स्पर्धेचा विजेता बनून त्याने ‘माले केसरी किताब’ व गदा मिळवली होती. विक्रम याने अनेक राष्ट्रीय पदके व किताबावर आपले नाव कोरले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेतही त्याने सहभाग घेतला होता. युवा पैलवानांसाठी आदर्श असणाऱया विक्रम याला कुस्ती क्षेत्रात आदर्श व गुणी खेळाडू म्हणून ओळखले जायचे. अनेक नामांकित कुस्ती स्पर्धांत माणगाव आणि मुळशी तालुक्याचे नाव विक्रम याने उंचावले होते.

हिंदकेसरी पै. अमोल बुचडे हे विक्रमचे गुरू होते. विक्रमचे वडील शिवाजीराव पारखी हे निवृत्त सैनिक असून त्यांनी 1999च्या कारगिल युद्धात सहभाग घेतला होता. विक्रम याच्या पश्चात आई, वडील, एक विवाहित भाऊ व एक बहीण असा परिवार आहे.

लग्नघरावर शोककळा

पैलवान विक्रमचा 12 डिसेंबर रोजी विवाह होता. कुटुंबीयांकडून लग्नाची जय्यत तयारी सुरू होती. लग्नपत्रिका वाटपाचे काम अंतिम टप्प्यात आले होते, मात्र अवघ्या आठ दिवसांवर विवाह सोहळा आला असतानाच काळाने घाला घातला. त्यामुळे आनंदमयी वातावरण असलेल्या पारखी कुटुंबीयांच्या लग्नघरावर शोककळा पसरली.