23 वर्षांच्या जैसवालचा ब्रॅडमनना मागे टाकण्याचा प्रयत्न

सर डॉन ब्रॅडमन यांची कसोटीतील 99.94 धावांची सरासरी गेली 76 वर्षे अबाधित आहे आणि यापुढे ती मोडली जाण्याची शक्यताही कमीच आहे. मात्र सध्या त्यांनी 23 व्या वर्षी केलेल्या पाच दीडशतकी विक्रमाची बरोबरी करण्याची संधी हिंदुस्थानच्या धडाकेबाज सलामीवीर यशस्वी जैसवालला लाभली आहे. यशस्वीचा शतकांचा झंझावात पाहता तो ब्रॅडमन यांची बरोबरीही साधू शकतो आणि त्यांना मागेही टाकू शकतो. यापैकी कोणता विक्रम करण्यात तो यशस्वी ठरतोय ते त्याची फलंदाजीच ठरवेल.

पर्थ कसोटीत यशस्वीने 161 धावांची खेळी करताना आपल्या पहिल्या चारही शतकांना दीडशतकात रूपांतरित करण्याची किमया केली आणि त्याचबरोबर त्याने दक्षिण आफ्रिकन ग्रीम स्मिथच्या पहिल्या चार दीडशतकांच्या पराक्रमाची बरोबरी साधली. स्मिथनेही आपल्या पहिल्या चार शतकांना दीडशतकी मुलामा चढवला असला तरी त्यापैकी तीन द्विशतके होती. स्मिथने कारकीर्दीच्या प्रारंभीच 200, 151, 277, 259 अशी चार शतके ठोकली होती. जैसवालचीही पहिली चार शतके 171, 209, नाबाद 214, 161 अशी आहेत. फक्त ब्रॅडमनच असे एकमेव फलंदाज आहेत, ज्यांनी वयाची 23 वर्षे पूर्ण करण्याआधी 112, 123, 131, 254, 334, 232, 223, 152 अशी एकूण आठ शतके ठोकली आहेत आणि त्यापैकी पाच दीडशतके आहेत. आता या विक्रमाची बरोबरी साधण्यासाठी पुढील तीन कसोटींत यशस्वीला केवळ एक दीडशतक ठोकावे लागणार आहे. तसेच त्याला 23 व्या वाढदिवसापर्यंत आठ शतकांच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.

ग्रीम स्मिथ आणि जावेद मियांदाद यांनीही वयाच्या तेविशीपर्यंत सहा शतके ठोकली आहेत. या विक्रमांच्या पंक्तीतही जैसवाल स्वताला बसवू शकतो. येत्या 28 डिसेंबरला यशस्वी आपला 23 वा वाढदिवस साजरा करणार आहे. यादरम्यान हिंदुस्थानी संघ तीन कसोटी सामने खेळणार असून त्याने या तिन्ही कसोटींत आपले शतकी सातत्य कायम ठेवण्यात यश मिळवले तर तो या विक्रमांची बरोबरीही साधू शकतो आणि यांना मागेही टाकू शकतो.

मोहम्मद युसूफ आणि सचिन तेंडुलकरचा विक्रमही नजरेसमोर

यशस्वी जैसवालने या वर्षी 12 कसोटींत 1280 धावा केल्या आहेत. यात तीन शतकांचा आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे. आता त्याच्यासमोर एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 1788 धावा करणार्या मोहम्मद युसूफचा विक्रमही आहे आणि हिंदुस्थानकडून 1562 धावा करणारा सचिन तेंडुलकरही आहे. 147 वर्षांच्या कसोटी इतिहासात आतापर्यंत केवळ आठ फलंदाजांनी पॅलेंडर वर्षात दीड हजार धावा केल्या आहेत. या विक्रमापासून यशस्वी केवळ 220 धावा मागे आहे. तो कुठे पुढे जातोय, ते पाहणे थरारक ठरणार आहे.