हिंदुस्थानचा नव्या दमाचा बुद्धिबळपटू दोम्माराजू गुकेश आणि जगज्जेता चीनचा डिंग लिरेन यांच्यातील जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेतील आठवी लढतही बरोबरीत सुटली. उभय तुल्यबळ खेळाडूंमधील सलग पाचवा डाव बरोबरीत सुटल्याने यांच्यातील बरोबरीची कोंडी संपण्याची वाट अवघं विश्व पाहू लागलेय. आठव्या फेरीअखेर दोघांच्याही खात्यात 4-4 असे समान गुण आहेत. जो खेळाडू 7.5 गुणांची कमाई करेल, त्याच्या गळ्य़ात जगज्जेतेपदाची माळ पडणार आहे.
चौदा फेऱयांच्या या स्पर्धेत गुकेश-लिरेन यांच्यात सहाव्यांदा बरोबरी झाली. 32 वर्षीय डिंग लिरेनने सलामीच्या लढतीत बाजी मारली होती, तर 18 वर्षीय गुकेशने तिसरी लढत जिंकून बरोबरी साधली होती. इतर सहाही लढती बरोबरीत सुटल्या आहेत. उभय खेळाडूंमधील आठवी लढत चार तासांहून अधिक वेळ रंगली. अखेर 51व्या चालीनंतर दोन्ही खेळाडूंनी डाव बरोबरीत सोडण्यास मान्यता दिली. सुरुवातीला गुकेशने बरोबरीस मान्यता दिली नव्हती, म्हणून ही लढती आणखी काही वेळ लांबली. 14 फेऱयांची ही लढत शेवटपर्यंत बरोबरीत राहिल्यास विजेतेपदाचा फैसला फास्टर टाईम कण्ट्रोल (ब्लिट्ज बुद्धिबळ प्रकार) पद्धतीने होईल. त्यामुळे आगामी प्रत्येक लढतीवर अवघ्या क्रीडाविश्वाच्या नजरा असतील.