म्हात्रे-सूर्यवंशीच्या षटकारबाजीने हिंदुस्थान उपांत्य फेरीत, यूएईचा दहा विकेटनी केला पराभव

19 वर्षांखालील मुलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी या युवा फलंदाजांच्या ‘षटकारबाजी’ने हिंदुस्थानने यूएईचा 10 विकेट्स आणि 203 चेंडू राखून पराभव केला आणि आपल्या उपांत्य फेरी प्रवेशावर शिक्कामोर्तब केले. आता 6 डिसेंबरला होणाऱया उपांत्य सामन्यात हिंदुस्थानची गाठ श्रीलंकेशी तर पाकिस्तान-बांगलादेश एकमेकांशी भिडतील. या सामन्यातील विजेते संघ येत्या रविवारी दुबईत जेतेपदासाठी संघर्ष करतील.

हिंदुस्थानच्या युवा संघाला आपल्या सलामीच्याच लढतीत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून 43 धावांनी हार सहन करावी लागली होती. त्यामुळे हिंदुस्थानला दोन्ही साखळी सामन्यांत विजय अनिवार्य होता. हिंदुस्थानने परवा दुबळय़ा जपानचा 211 धावांनी धुव्वा उडवताना त्यांना क्रिकेटचे बाळकडू पाजले होते. त्यानंतर आज अखेरच्या साखळी सामन्यात जो संघ जिंकेल तोच उपांत्य फेरी गाठणार होता. त्यात हिंदुस्थानच्या संघाने बाजी मारली.

हिंदुस्थानी माऱ्यापुढे यूएई ढेपाळली

यूएईच्या अयान अफझल खानने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, पण त्याचा निर्णय हिंदुस्थानी गोलंदाजांनी त्याच्यावर उलटवून लावला. सलामीवीर अक्षत राय (26) आणि मुहम्मद रायन (35) यांनाच हिंदुस्थानी गोलंदाजांसमोर धावा काढता आल्या. या दोघांव्यतिरिक्त अन्य एकही फलंदाज धावांची विशीही गाठू शकला नाही. एवढेच नव्हे तर 7 फलंदाज दोन अंकी धावाही करू शकले नाहीत. हिंदुस्थानच्या युधजीत गुहा (15/3), चेतन शर्मा (27/2) आणि हार्दिक राज (28/2) यांनी अचूक मारा करत यूएईचा डाव 44 षटकांत 137 धावांत संपुष्टात आणत आपला उपांत्य फेरी प्रवेश जवळजवळ निश्चित केला होता.

पाकिस्तान-श्रीलंका अपराजित

शुक्रवारी होणाऱया उपांत्य सामन्यात पाकिस्तानची गाठ बांगलादेशही होणार आहे, तर श्रीलंकेचा संघ हिंदुस्थानची भिडेल. पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी विजयाची हॅट्ट्रिक साजरी करत उपांत्य फेरी गाठली आहे. हे साखळीत अपराजित असलेले संघ एकेक सामना गमावलेल्या हिंदुस्थान आणि बांगलादेश या संघांविरुद्ध खेळणार आहेत. त्यामुळे अपराजित संघांना धक्का देत हिंदुस्थान, बांगलादेश अंतिम फेरी गाठतात की पाकिस्तान आणि श्रीलंका विजयाच्या चौकारानिशी जेतेपदाच्या सामन्यात स्थान मिळवतात? याचा फैसला शुक्रवारी होईल.

वैभव-आयुषची फटकेबाजी

वयाच्या 13 व्या वर्षीच आयपीएलच्या लिलावात 1.20 कोटींची कमाई करणाऱया बिहारच्या वैभव सूर्यवंशीने आज तुफान फटकेबाजी करत आपल्या झंझावाती खेळाची झलक दाखवली. त्याच्यासोबत मुंबईकर आयुष म्हात्रेनेही आपला वेगवान खेळ दाखवत षटकारांची आतषबाजी केली. या दोघांनी विजेत्यांच्या थाटात षटकारबाजी करताना चक्क दहा चेंडू सीमारेषेवर फटकावले. दोघांनी 16.1 षटकांत विजयी लक्ष्य गाठले. वैभवने उद्दिश सुरीच्या चेंडूला थेट प्रेक्षकांमध्ये मारताना संघाच्या मोठय़ा विजयावर शिक्कामोर्तब केले. वैभवने 46 चेंडूंत 3 चौकार आणि 6 षटकारांचा वर्षाव करत नाबाद 76 धावांची खेळी साकारली तर आयुष म्हात्रेनेही 51 चेंडूंत 4 चौकार आणि 4 षटकार खेचत 67 धावा केल्या. त्याने यूएईसाठी सर्वात 35 धावा करणाऱया रायनचा यष्टीही वाकवली होती. त्यामुळे ‘सामनावीर’ पुरस्काराचा मान त्याला देण्यात आला.