
पर्थ कसोटीतील सुपर कामगिरीनंतर जसप्रीत बुमरा हा क्रिकेट विश्वातील तिन्ही फॉरमॅटमधील सर्वोत्तम गोलंदाज असल्याचे कौतुक खुद्द ऑस्ट्रेलियन महान कर्णधार रिकी पॉण्टिंगने केले आहे. गेल्या आठवडय़ात बुमराच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाचा पर्थ कसोटीत 295 धावांनी पराभव केला होता. पहिल्या डावात बुमरानेच पाच विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा डाव 104 धावांत गुंडाळला होता. एका कर्णधारासाठी संघासोबत उभे राहणे महत्त्वाचे असते आणि बुमराने सर्वांना दाखवून दिले की तो क्रिकेट विश्वातील सर्व फॉरमॅटमधील सर्वश्रेष्ठ गोलंदाज आहे. पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी वर्चस्व दाखवले होते, पण बुमराच्या मार्याने ते वर्चस्व धुळीस मिळवले. त्याने आपण सगळय़ात वेगळे असल्याचेही दाखवले. त्याच्या गोलंदाजीची क्षमता आणि अन्य गोलंदाज यांच्यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. तो हिंदुस्थानचा महान गोलंदाज असल्याचेही पॉण्टिंग म्हणाला.