
मुख्यमंत्री पदावरून गेले अकरा दिवस चाललेला गोंधळ संपला. भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांची गटनेता म्हणून सर्वानुमते निवड करून मुख्यमंत्रीपदी तेच विराजमान होणार यावर शिक्कामोर्तब केले गेले. त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांकडे जाऊन सत्तास्थापनेचा दावा केला. नव्या सरकारचा शपथविधी सोहळा आझाद मैदानावर होणार असून तिथे महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत, तर त्यांच्याबरोबर अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मिंधे गटाचे सरदार एकनाथ शिंदे यांनीही सत्तेत सहभागी व्हावे अशी विनंती फडणवीस यांनी करूनही गृह, महसुलाच्या लालसेपोटी त्यांचे तळय़ात… मळ्य़ात सुरूच आहे.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मिंधे गट मुख्यमंत्री पदासाठी अडून राहिल्याने पाच दिवस त्यातच गेले. त्यानंतर हायप्रोफाईल मंत्रीपदांच्या मागणीवरूनही मिंध्यांनी भारतीय जनता पक्षावर दबाव आणला होता. भाजपमध्येही देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री बनवणार की अन्य कुणाकडे ती जबाबदारी सोपवणार याचा निर्णय केंद्रीय निरीक्षकांवर सोपवला गेला होता.
आज विधान भवनात भाजप आमदारांची बैठक झाली. त्या बैठकीत पेंद्रीय निरीक्षक विजय रूपाणी आणि निर्मला सीतारामन यांच्या उपस्थितीत भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी गटनेता म्हणून फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला भाजपा आमदारांनी अनुमोदन दिले. त्यानंतर फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्याचे सीतारामन आणि रूपाणी यांनी जाहीर करून त्यांचे अभिनंदन केले.
देवेंद्र फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर दुपारी पावणेतीन वाजता महायुतीच्या नेत्यांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी पार पडली. तेथून फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे एकाच गाडीतून राजभवनात गेले, मात्र तिथेही शिंदे यांच्या चेहऱयावरची नाराजी लपून राहिली नाही. राज्यपालांकडे तिघांनीही सत्तास्थापनेचा दावा करत आमदारांचे बहुमत महायुतीकडे असल्याचे पत्र राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना सोपवले. राज्यपाल राधाकृष्णन यांनी त्यांना सत्तास्थापनेसाठी निमंत्रणही दिले. उद्या शपथविधी सोहळय़ात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यासह पाच मंत्री शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येते.
शपथविधी… नव्हे शक्तिप्रदर्शन
शक्तिप्रदर्शन करण्याची भाजपची योजना आहे. या सोहळय़ाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह 22 राज्यांतील मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. अजित पवार गटाने त्यांच्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱयांना गुलाबी साडय़ा तर पुरुषांना भगवे फेटे परिधान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आझाद मैदान परिसर नो पार्किंग झोन; भुयारी मार्ग बंद
शपथविधी सोहळ्यामुळे आझाद मैदान परिसर उद्या नो पार्किंग झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. तसेच वाहतुकीतही मोठे बदल करण्यात आले आहेत. आझाद मैदान परिसरातील दुकाने, सी. एस. एम. टी स्थानकाजवळील सब वे बंद ठेवण्यात येणार आहेत. चर्चगेट स्थानकाजवळील सब वेतील दुकाने पूर्णतः बंद करण्यात आली आहे.
पाच अपर पोलीस आयुक्त, 15 उपायुक्त, 29 सहाय्यक पोलीस आयुक्त, 520 पोलीस अधिकारी, 3500 अंमलदार तैनात करण्यात येणार आहेत. शिवाय वाहतूक व्यवस्थेकरिता एक अपर पोलीस आयुक्त, तीन उपायुक्त, 30 अधिकारी आणि 250 अंमलदार तैनात ठेवण्यात येणार आहेत.
शिंदेंची गाडी अजूनही अडलेली
एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सत्तेत सहभागी व्हावे अशी विनंती फडणवीस यांनी केली आहे. शिंदे गटाच्या आमदारांचीही तीच भूमिका आहे. मात्र, एकनाथ शिंदे यांची गाडी अजूनही गृहमंत्री पदावर अडली आहे. बुधवारी सायंकाळी फडणवीस यांनी वर्षा निवास्थानी शिंदे यांची भेट घेऊन पाऊन तास चर्चा केली. यावेळी उद्या होणाऱ्या शपथविधीत काही मंत्र्यांचाही शपथविधी व्हावा तसेच उपमुख्यमंत्री पदाबरोबर गृहमंत्री पद आपल्याला देण्यात यावे अशी मागणी केली. फडणवीस यांनी पक्षश्रेष्ठीशी चर्चा करून कळवतो, असे सांगत शिंदे यांचा निरोप घेतला.
मी अमित शहांना भेटायला दिल्लीला गेलोच नव्हतो – अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला गेले होते; परंतु त्यांना भेट नाकारण्यात आली अशी वृत्ते प्रसारमाध्यमांनी दाखवली होती. त्यावर अजित पवार यांनी यावेळी स्पष्टीकरण देताना आपण अमित शहांना भेटायला गेलोच नव्हतो असा दावा केला. ते म्हणाले की, मी कोणाच्या भेटीसाठी गेलो नव्हतो. सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवण्यात आलेलं आहे. त्या खासदार आहेत. त्यांना 11 जनपथ बंगला देण्यात आलेला आहे. कोणतंही घर असू द्या, ते माझं स्वतःचं असो वा सरकारी असो, मला ते नीटनेटकं लागतं. त्यामुळे आर्किटेक्टला सोबत घेऊन नियमात बसून काय गोष्टी करता येतात का त्या पाहण्यासाठी दिल्लीला गेलो होतो,’ असे अजित पवार म्हणाले.
सत्तास्थापनेचा दावा दाखल करण्यापूर्वीच शपथविधीची निमंत्रण पत्रिका व्हायरल
सत्तास्थापनेचा दावा राज्यपालांकडे करण्यापूर्वीच शपथविधीची निमंत्रण पत्रिका आज व्हायरल झाली होती. ‘देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तसेच उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ गुरुवारी 5 डिसेंबर 2024 रोजी सायं. 5.30 वाजता आझाद मैदान येथे होणार आहे,’ असा त्या निमंत्रण पत्रिकेत मजकूर होता.
अजितदादा म्हणाले, मै रुकने वाला नहीं
मुख्यमंत्र्यांसह तुम्हीही शपथ घेणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता शिंदे म्हणाले, संध्याकाळपर्यंत थांबा सगळं कळेल. तर अजित पवार यांनी मै तो शपथ लेने वाला हूँ, रुकने वाला नहीं, असे सांगितले. तेव्हा दादांना अनुभव आहे. सकाळी आणि संध्याकाळीही शपथ घेण्याचा, अशी मिश्किल टिपण्णी शिंदे यांनी केली.
सर्वांना सोबत घेऊन काम करू – फडणवीस
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी आता अधिक वाढली असून महायुती सरकार एकदिलाने सर्वांना सोबत घेऊन काम करेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी भाजप विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर सांगितले. मुख्यमंत्री पद ही तांत्रिक व्यवस्था आहे. आम्ही तिन्ही पक्ष मिळून सरकार चालवू, असे त्यांनी आश्वस्त केले.
एकनाथ शिंदेंचे ‘वर्षा’अखेर
विधानसभा निवडणूक आपल्या नेतृत्वात लढविण्यात आल्याने मुख्यमंत्रीपदाची माळ पुन्हा आपल्या गळ्यात पडेल, अशी आशा एकनाथ शिंदे यांना होती. गेल्या आठवडय़ात दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही आणखी सहा महिने आपल्याला मुख्यमंत्रीपदी राहू द्या, अशी विनवणी शिंदे यांनी केली होती. मात्र, अमित शहा यांनी त्यास स्पष्ट शब्दात नकार देत ‘वर्षा’अखेरचा निरोप दिला.
आपल्या मनासारखे काहीच घडत नसल्याने अस्वस्थ झालेले शिंदे आजारपणाचे निमित्त करून साताऱयातील दरे गावी निघून गेले. दोन दिवसांनी गावाहून परतल्यावरही वर्षा या शासकीय निवासस्थानी येण्याचे सोडून ते ठाण्यातील घरीच थांबले. राज्यपालांकडून सत्तास्थापनेसाठी आमंत्रण येण्याआधीच भाजपने शपथविधीची घोषणा करत शिंदे यांना वर्षा निवासस्थान सोडण्याचे संकेत दिले.
शहांनी झिडकारले
महायुतीमध्ये भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या आहेत. एकटा भाजप हाताच्या बोटावर मोजण्या एवढय़ा जागांनी बहुमतापासून दूर आहे, असे सुनावत अमित शहा यांनी शिंदे यांची पुन्हा मुख्यमंत्री होण्याची मागणी झिडकारून लावली. मुख्यमंत्री पद मिळणार नाही हे स्पष्ट झाल्यावर उपमुख्यमंत्री पदाबरोबर गृहमंत्रीपद मिळावे असा आग्रह शिंदे यांनी धरला आहे. मात्र, भाजप पक्षश्रेष्ठीनी ही मागणीही धुडकावून लावल्याने शिंदे अस्वस्थ आहेत.