अफगाणिस्तानात महिलांच्या नार्सिंग शिक्षणावर बंदी

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता काबीज केल्यानंतर महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. तालिबानने अफगाण महिलांना शिक्षण घेण्यास बंदी घातली आहे. याच पार्श्वभूमीवर तालिबानने आणखी एक तानाशाही निर्णय घेतला. त्यानुसार अफगाण महिलांना नर्सिंगचे शिक्षण घेण्यास बंदी घातली आहे. त्या निर्णयामुळे अफगाण महिलांसाठी शिक्षणाचे दार पूर्णपणे बंद झाले आहे. तालिबानींकडून पुढील सूचना येईपर्यंत ही बंदी असेल.

अफगाणिस्तानमध्ये सध्या आरोग्य व्यवस्था गंभीर परिस्थितीत आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने 2023 मध्ये जाहीर केले होते की, देशाला गरजा भागवण्यासाठी किमान 18,000 नर्सची आवश्यकता आहे.   जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, अफगाणिस्तानमधील मृत्युदर जास्त आहे. एक लाख जन्मामागे 620 मातांचा मृत्यू होतो. अशी गंभीर परिस्थिती असताना तालिबानने नर्सिंग शिक्षणावर बंदी घातली आहे. तालिबान सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

2021 पासून किशोरवयीन मुलींच्या शिक्षणावर बंदी

तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर 2021 पासून किशोरवयीन मुलींना शिक्षणापासून दूर ठेवण्यात आलंय. तालिबान सरकारने वचन दिले होते की, अभ्यासक्रम इस्लामिक तत्त्वांशी सुसंगत बनवून नंतर शिक्षण पुन्हा सुरू करण्यात येईल, मात्र तसे काही अद्याप झालेले नाही. आता दाई किंवा नर्सिंग शिक्षण घेणे हे महिलांसाठी शिक्षणाचे एकमेव पर्याय होते, मात्र हे पर्यायही बंद करण्यात आले आहेत. अफगाणिस्तान महिलांवर उपचार करण्यासाठी पुरुष डॉक्टरांना पुरुष संरक्षकाच्या उपस्थितीतच परवानगी आहे. सध्या 17,000 महिला नर्सिंग किंवा दाईचे प्रशिक्षण घेत आहेत. मात्र, तालिबानच्या या निर्णयामुळे या महिलांचे भवितव्य अनिश्चित झाले आहे.