देशात हुकूमशाही सुरू आहे; राहुल गांधी यांना संभलमध्ये जाण्यापासून रोखल्याच्या घटनेवर संजय सिंह यांचा संताप

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना संभलमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले. या घटनेबाबत आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी संताप व्यक्त केला आहे. सध्या देशात हुकूमशाही आहे. पोलीस हत्या करत आहेत. दंगली, जाळपोळीच्या घटना घडत आहेत. या घटना घडल्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांना घटनास्थळी जाण्यापासून रोखण्यात येते. पीडित कुटुंबाना भेटून त्यांचे सांत्वन करणे हे लोकशाहीच्या आणि मानवतेच्या दृष्टीकोनातून गरजेचे आहे. मात्र, देशात अशीप्रकारची हुकूमशाहीआहे की पाडितांची भेट घेण्यापासूनही रोखण्यात येत आहे, असा शब्दांत संजय सिंह यांनी संताप व्यक्त केला आहे.

उत्तर प्रदेशात सध्या संभलची घटना चर्चेत आहे. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी पीडितांना भेटण्यासाठी संभलला जात होते. मात्र, तेथे जाण्यापासून त्यांना रोखण्यात आले. पोलीस लोकांना मारत आहेत, परंतु कोणीही पीडित कुटुंबांना भेटण्यासाठी आणि त्यांचे सांत्वन करण्यासाठी जाऊ शकत नाही. देशात ही कसली हुकूमशाही आहे? असे संजय सिंह म्हणाले. एसएडी नेते सुखबीर सिंग बादल यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत ते म्हणाले की, पंजाब सरकार आणि पोलिस प्रशासन या प्रकरणाची चौकशी करत आहे. लवकरच कारवाई केली जाईल.