हळूहळू थंडी वाढत आहे, सकाळ आणि रात्री हवामानाच्या तापमानात लक्षणीय घट होत आहे. अशातच सकाळी गाडी सुरू करण्यात अनेकांना अडचणी येतात. परंतु अनेकदा लोक त्यांच्या वाहनांची सर्व्हिस वेळेवर करत नाही. तसेच इंजिन ऑइल जुने होते आणि लोक ऑइल बदलत नाहीत. जर तुम्हाला तुमच्या कारला नेहमी फिट ठेवायचे असेल, तर कारमध्ये किती किलोमीटरनंतर ऑईल टॉप-अप करावे किंवा बदलले पाहिजे, हे जाणून घेणं महत्वाचं आहे. आज आपण याचबद्दल जाणून घेणार आहोत…
टॉपअप किंवा इंजिन ऑइल कधी बदलावे
वाहनातील इंजिन ऑइल प्रत्येक 5,000 ते 6,000 किलोमीटर नंतर बदलले पाहिजे. असे केल्याने इंजिनचे आयुष्य तर वाढेलच पण परफॉर्मन्सही सतत सुधारेल. तर हिवाळ्यातही तुम्हाला इंजिन ऑइल वेळेवर बदलावे लागेल. जर तुमची कार शहरात दररोज 50 किलोमीटरहून अधिक चालत असेल तर तुम्हाला सर्व्हिससोबत इंजिन ऑइलची काळजी घ्यावी लागेल.
वाहन तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुम्ही वेळेवर इंजिन ऑइल बदलले नाही तर इंजिन खराब होऊ लागते. इंधनाचा वापर वाढू लागतो. अतिउष्णतेच्या समस्या सुरू होतात. आवाजाची पातळी वाढते आणि काही प्रकरणांमध्ये इंजिन पूर्णपणे निकामी होऊ शकते. त्यामुळे तुमचे खूप नुकसान होऊ शकते.
तज्ज्ञांच्या मते, कोणत्याही वाहनात इंजिन ऑइल वेळेवर बदलणे अत्यंत आवश्यक असते. जर इंजिन ऑइलचे प्रमाण कमी वाटत असेल आणि ते काळे झाले असेल तर इंजिन ऑइल बदल. यातच सध्या बाजारात वेगवेगळे इंजिन ऑइल येऊ लागले आहे, जे चांगले परफॉर्मन्स देण्याचा दावा करतात. मात्र तुम्ही कंपनीने शिफारस केलेले इंजिन ऑइल वापरावं.
दरम्यान, हिवाळ्यात तापमान कमी होते, तेव्हा इंजिन ऑइल घट्ट होते, ज्यामुळे ते सहजपणे सर्क्युलेट होत नाही. अशातच तुम्ही तुमच्या वाहनात हिवाळ्यातील दर्जाचे इंजिन ऑइल वापरू शकता, कारण हे इंजिन ऑइल थंड वातावरणात द्रव राहते. मल्टीग्रेड ऑइल (जसे की 5W-30) निवडा जे कमी आणि जास्त तापमान दोन्हीमध्ये प्रभावी आहे.