अर्थव्यवस्था गारठली; रुपया रसातळाला, महागाईची लाट

तब्बल 5 ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न पहाणाऱ्या मोदी सरकारच्या आर्थिक कामगिरीचा लेखाजोखा समोर आला आहे. संपूर्ण अर्थव्यवस्थाच गारठली असून रुपया अक्षरशः रसातळाला गेला आहे. उत्पादन क्षेत्राची वाढ तब्बल 11 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरली असून जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कंपन्यांची कामगिरी प्रचंड निराशाजनक राहिली आहे. त्याचे पडसाद शेअर बाजारावरही उमटले असून विदेशी गुंतवणूकदार आपले पैसे काढून घेत आहेत. जीडीपी घसरला असून महागाईनेही उच्चांक गाठला आहे. घाऊक बाजारात शेवगा तब्बल 500 रुपये किलोने विकला जात आहे तर तेलाचे दरही चांगलेच कडाडले आहेत. त्यामुळे हॉटेलिंगही सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांवर 100 टक्के शुल्क लागू करण्याचा इशारा दिला आहे. याचाही फटका हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेला बसण्याची शक्यता आहे. दुसऱया तिमाहीत देशाची अर्थव्यवस्था मंदावली असून चालू आर्थिक वर्षात जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत देशाची आर्थिक वाढ 5.4 टक्क्यांपर्यंत राहिली ही वाढ दोन वर्षांतील सर्वात कमी पातळी आहे.

रुपया गडगडला

मंगळवारी भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत चार पैशांनी घसरून 84.76 प्रति डॉलरच्या सार्वकालिक नीचांकी पातळीवर घसरला. जागतिक बाजारात मजबूत झालेला डॉलर आणि परदेशी पंपन्यांनी सातत्याने गुंतवणूक काढून घेतल्याने ही परिस्थिती ओढवल्याचे चित्र आहे.

मोदींनी कुचक्र बनवले – काँग्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक कुचक्र बनवले असून कमी विकास, कमी नोकऱया, कमी उत्पन्न, वाढती महागाई. कमी बचत. कमी मागणी, गुंतवणूकीत घसरण असे हे कुचक्र असल्याचा टोला काँग्रेसने एक्सवरून लगावला आहे. परंतु, मोदींना याने काहीच फरक पडत नाही, ते तर मोदींना वाचवण्यात व्यस्त आहेत, असेही काँग्रेसने म्हटले आहे.

ऑक्टोबरमध्ये महागाईचा भडका उडाला. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर 6.21 टक्के झाला. ही वाढ 14 महिन्यांतील सर्वोच्च आहे. तर खाद्यपदार्थांच्या किमती वाढल्यामुळे महागाईने कहर केला. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर 4.87 टक्के होता. दरम्यान, किरकोळ महागाई वाढल्याने रिझर्व्ह बँकेकडूनही व्याजदरात कपात होण्याची शक्यता मावळली आहे.