पाच महिन्यांत 47 लाख मतदार वाढल्याचा पुरावा काय? बूथ आणि मतदारसंघनिहाय माहिती देण्याची; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी

देशात विविध प्रकारच्या निवडणुकांसाठी बरोबरीचे मैदान मिळाले नाही तर लोकशाही आणि संविधानाच्या मूळ संरचनेवर आघात होतो, ही बाब निदर्शनास आणून देत आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाकडे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीशी संबंधित अनेक मुद्दे आणि विसंगती मांडल्या. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान 5 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 47 लाख मतदार जोडले गेले त्याचा पुरावा काय, असा सवाल करत याचा बूथ आणि मतदारसंघनिहाय अहवाल सादर करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

महाराष्ट्रात मतदारांची संख्या मोठय़ा प्रमाणावर घटल्याचे निवडणूक आयोग सांगत आहे. याबाबतचा बूथ आणि मतदारसंघनिहाय अहवाल सादर करा, जो सध्या अस्तित्वातच नाही, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. निवडणूक बूथ आणि मतदारसंघनिहाय मतदारांचा आकडा कळला तर हे समजेल की, महाराष्ट्रात इतक्या मोठय़ा प्रमाणावर मतदारांची संख्या कमी होण्यामागचे नेमके कारण काय, असे काँग्रेस खासदार आणि मुख्य प्रवत्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितले. शिष्टमंडळाची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिष्टमंडळात काँग्रेस महासचिव मुकुल वासनिक, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेसचे माध्यमप्रमुख पवन खेरा यांचा समावेश होता.

वाढीव मतदानाबद्दल समाधानकारक उत्तर नाही

निवडणूक आयोगाने महाराष्ट्रात सायंकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के मतदान झाल्याचे व्होटर टर्नआऊटच्या माध्यमातून सांगितले, तर रात्री साडेअकरा वाजता 65.02 टक्के आणि दोन दिवसांनंतर 67 टक्के मतदान झाल्याचे सांगितले. याबाबत विचारले असता व्होटर टर्नआऊट ही एक वेगळी प्रक्रिया आहे आणि 17 सी एक अलग प्रक्रिया आहे, अशा प्रकारचे उत्तर देण्यात आले, असे सिंघवी यांनी सांगितले.

त्या 102 मतदारसंघांत सत्ताधाऱ्यांचा विजय

तब्बल 118 असे मतदारसंघ आहेत जिथे लोकसभा आणि विधानसभेदरम्यान 25 हजारांहून अधिक मतदारांचा फरक दिसत आहे. यातील 102 मतदारसंघांत सत्ताधारी पक्षातील उमेदवारांचा विजय झाल्याकडेही शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले.