तारपट्टा मशीन डोक्यावर पडून कारागीराचा मृत्यू

कारखान्यात असुरक्षित पद्धतीने ठेवलेली तारपट्टा मशीन एका कारागीराचा धक्का लागल्याने तेथे झोपलेल्या अन्य कारागीरांच्या अंगावर पडली. त्यात एक कारागीर किरकोळ जखमी झाला, तर झोपलेल्या कारागिराच्या डोक्यावर पडल्याने त्यातच त्याचा गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाल्याची घटना झवेरी बाजार येथे घडली.

झवेरी बाजार येथील तेल गल्लीतील एका इमारतीच्या तळमजल्यावर कारखाना असून तेथे तारपट्टाचे काम चालते. कारखान्यात एके ठिकाणी तारपट्टाच्या कामासाठी मोठी मशीन आणून ठेवण्यात आली आहे, तर कारखान्यात काम करणारे आठ तरुण काम झाल्यानंतर तेथे झोपतात. सोमवारी रात्रीदेखील ते कारागीर जेवण करून आपापल्या जागी झोपले होते. दरम्यान मशीनच्या एका बाजूला मंगल मंडल व स्वरूप घोष हे दोघे अंथरुणावर पडून मस्ती करत होते, तर दुसऱया बाजूला सौम्या रॉय आणि अनुपम घोष असे दोघे झोपले होते. मस्ती करणाऱया मंगल व स्वरूप यांचा तारपट्टाच्या मशीनला धक्का लागला. त्यामुळे ती मशीन सौम्या आणि अनुपमच्या अंगावर पडली. त्यात दोघेही जखमी झाल्याने त्यांना अन्य कारागीरांनी तत्काळ गोकुळदास तेजपाल इस्पितळात नेले. तेथे सौम्यावर उपचार केले. मात्र अनुपमचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अनुपमच्या डोक्यावर मशीन पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी कारखाना मालकासह अन्य चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एल टी मार्ग पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.