वांद्रे पूर्व येथे आज दुपारी जलवाहिनी फुटल्याचा व्हिडीओ प्रसारमाध्यमातून व्हायरल झाला. मात्र जलवाहिनी फुटली नाही तर देखभालीचे काम करताना जलवाहिनीत अडकून पडलेली हवा बाहेर काढण्याचे काम करण्यात आले. यामुळे पाणीपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती मुख्य जलअभियंता पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली.
वांद्रे पूर्व येथे काही महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी रहिवाशांकडून वारंवार येत होत्या. त्या तक्रारींचा पाठपुरावा केल्यानंतर वांद्रे पूर्व परिसराला पाणीपुरवठा करणाऱया जलवाहिनीत हवा अडकल्याचे लक्षात आले. त्यानुसार ही हवा बाहेर काढण्यासाठी जलअभियंता विभागाने आज काम हाती घेतले. त्याकरिता ‘एअर व्हॉल्व्ह ब्लिडिंग’ ही प्रक्रिया राबवण्यात आली. ही प्रक्रिया काही मिनिटे चालली. यावेळी जलवाहिनीतून हवा बाहेर पडताना त्याबरोबर पाणीही मोठय़ा वेगाने बाहेर पडत होते. त्यामुळे जलवाहिनी फुटली, असा गैरसमज बघणाऱयांचा झाला. दरम्यान, जलवाहिनीचे हे काम पूर्ण झाले असल्याचे महापालिकेने सांगितले.
पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत
वांद्रे पूर्व भागात पाणीपुरवठा कमी दाबाने होत असल्याने रहिवाशांच्या तक्रारी येत होत्या, मात्र आता जलवाहिनीत पाणी अडवून ठेवणारी हवा बाहेर काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे या भागातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे, अशी माहिती पुरुषोत्तम माळवदे यांनी दिली.