मुंबईसह महाराष्ट्रात सर्वसामान्य रहिवाशांना घरगुती वापरासाठी अदानी कंपनीच्या स्मार्ट प्रिपेड मीटरची सक्ती केली जाणार नाही असे सरकारने पावसाळी अधिवेशनात सांगितले होते, मात्र तरीही मुंबईत अनेक ठिकाणी विशेषतः कुर्ला ते कुलाबा परिसरात रहिवाशांना अंधारात ठेवून स्मार्ट मीटर लावले जात आहेत, मात्र या स्मार्ट मीटरला रहिवाशांचा जोरदार विरोध आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत स्मार्ट मीटर लावू नयेत आणि लावलेले नवीन मीटर काढून पुन्हा जुने बेस्टचे मीटर लावावेत, या मागणीसाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ लवकरच बेस्टच्या महाव्यवस्थापकांची भेट घेणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे माजी आमदार दगडू सकपाळ यांनी दिली.
पेंद्रीय विद्युत मीटर स्थापना आणि प्रचालन, दुरुस्ती अधिनियमानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या मीटरचे अद्ययावतीकरण करण्यासाठी स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय लागू करण्यात आल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले. यानुसार प्रिपेड पद्धतीमध्ये कार्यरत असलेल्या स्मार्ट मीटरमधून वीजपुरवठा करण्यात येणार आहे तसेच या पुढे नवीन मीटर देताना केवळ स्मार्ट प्रिपेड मीटरचे कनेक्शनच देण्यात येणार आहे. राज्याच्या शिफारशीनंतर पेंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने याला मंजुरी दिली आहे. त्यामुळे मुंबईतील ग्राहकांना अद्ययावत सुविधा मिळणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान, वीज मीटरच्या अद्ययावतीकरणाच्या नावाने 11 लाख वीज ग्राहकांपैकी तीन लाख ग्राहकांसाठी नवीन स्मार्ट वीज मीटर बसवण्यात आले, मात्र शिवसेनेच्या आंदोलानानंतर बेस्टने स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामास स्थगिती दिली आहे.
ग्राहकांना नाहक भुर्दंड
स्मार्ट मीटरमुळे नाहक आर्थिक भुर्दंड पडत असल्यामुळे वीज ग्राहकांचा याला विरोध आहे. यामुळे वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलाला सामोरे जावे लागते. नव्या मीटरमुळे बेस्टचे मीटर वाचक, वीज वितरण कर्मचारी आणि रोख भरणा करणारे असे विविध खात्यांतील कर्मचारी बेरोजगार होणार आहेत.
जुने मीटर बनवणाऱ्या कंपन्या बंद झाल्या आहेत का?
ज्या वीज ग्राहकांचे जुने इलेक्ट्रॉनिक मीटर नादुरुस्त अथवा काही कारणांमुळे जळालेले आहेत आणि नवीन वीज ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक मीटर उपलब्ध नसल्यामुळे स्मार्ट मीटर बसवण्यात येत आहेत, अशी माहिती बेस्ट प्रशासनाने दिली. मात्र आतापर्यंत किती मीटर नादुरुस्त किंवा खराब झाले आहेत त्याची आकडेवारी बेस्टकडे मागितल्यावर बेस्ट ती देत नाही तसेच जुने इलेक्ट्रॉनिक मीटर बनवणाऱ्या कंपन्या बंद झाल्या आहेत का, असा प्रश्न विचारल्यावर बेस्ट प्रशासन मात्र निरुत्तर होते, अशी संतप्त प्रतिक्रिया दगडू सकपाळ यांनी दिली.