आज मुंबईत अदानी, लोढा, गुंडेचा, झुंडेचा घुसले व त्यांनी मराठी माणसांची नाकाबंदी सुरू केली. त्यात आता मराठी माणसाला उचलून आणून मारण्याची भाषा सुरू झाली व अशा धमक्या देणारे लोक फडणवीसांच्या अंतस्थ गोटातले आहेत हे दुर्दैव! त्यामुळे मराठी माणसाला अधिक एकजुटीने आणि सावधानतेने राहावे लागेल. तसेच तितक्याच निर्भयपणे ‘हर हर महादेव’चा गजर करावा लागेल. अर्थात बरे झाले, या निमित्ताने भाजपच्या पोटातील मराठीद्वेषाची मळमळ बाहेर पडली. आता त्यांच्याच हाती महाराष्ट्र राज्याची सूत्रे जात आहेत. म्हणून लढा थांबवता येणार नाही. गजाभाऊ, आता काय करणार? ‘मारता मारता मरावे’ या मंत्रास जागून तो लढेल व महाराष्ट्राच्या दुश्मनांना मारेल. फडणवीस, तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहणार? गजाभाऊ की तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचणाऱ्या उपऱ्या महाराष्ट्र दुश्मनांच्या बाजूने? एकदाच काय ते सांगून टाका!
संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर मुंबईत मराठी माणसाची जी दयनीय अवस्था झाली होती त्याचीच पुनरावृत्ती आता पुन्हा होताना दिसत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर समाजमाध्यमांवर टीका केल्याबद्दल फडणवीसांचे एक खासमखास ‘उपरे’ समर्थक इतके संतापले की, त्यांनी ‘गजाभाऊ’ या अज्ञात मराठी माणसाला ‘जगात जेथे असशील तेथून उचलून आणू,’ अशी धमकीच दिली. उचलून आणून हे काय त्याची पूजा करणार? उचलून आणू व मारू, खतम करू, हाच त्या धमकीचा गर्भित अर्थ आहे. मुंबईत या उपऱ्यांनी भाजपच्या पाठिंब्यावर कसा धुमाकूळ घातला आहे व मराठी जनतेला कसे धमकावत आहेत त्याचे हे उत्तम उदाहरण आहे. समाजमाध्यमांवर ‘गजाभाऊ’ हे पात्र लोकप्रिय आहे. महाराष्ट्र, मराठी माणूस अशा विषयांवर ते आपली परखड मते मांडत असतात. राज्यातील सामाजिक, राजकीय विषयांवर ‘गजाभाऊ’ आपली मते जोरात व्यक्त करतात व समाजमाध्यमांवर त्याबाबत वाद-प्रतिवाद होत असतात. भाजपच्या ‘ट्रोल’धाडीस जशास तसे उत्तर देण्याचे महाराष्ट्र कार्य ‘गजाभाऊ’ एखाद्या मर्द मावळय़ाप्रमाणे करतात व त्याची पोटदुखी भाजपच्या समर्थकांना आहे. त्या पोटदुखीतून थेट धमक्या देण्यापर्यंत मजल जावी व फडणवीसांनी या धमक्यांची दखल घेऊ नये हे आश्चर्यच आहे. फडणवीस यांच्या पक्षाचे बहुतेक उमेदवार मतांच्या रेट्याने जिंकले नसून पैसा, तपास यंत्रणा व ईव्हीएम हेराफेरीतून जिंकल्याचे सर्रास बोलले जाते. त्यामुळेच त्यांच्या विजयावर कोणी प्रश्नचिन्ह निर्माण केले की, त्यांचे लोक
टीकाकारांच्या अंगावर
धावतात. ही निकोप लोकशाही नाही. अनेक बँक घोटाळे तसेच अपहरण आणि लुटमार अशा गुन्ह्यात अडकलेली व्यक्ती फडणवीस हे विजयी होताच ‘सागर’ बंगल्यावर जाते व फडणवीस यांना खांद्यावर उचलून घेऊन नाचते, तीच व्यक्ती नंतर मराठी माणसांना उचलून आणून जीवे मारण्याची धमकी देते व भाजपमधील नामर्द मराठे हे अधःपतन उघड्या डोळ्याने पाहतात. महाराष्ट्र धर्माची ही अवहेलना आहे. ‘गजाभाऊ’ ही व्यक्ती नसून मराठी जनमानसाचे एक प्रतीक मानले पाहिजे व त्यांना जाहीर धमक्या देणारा जो कोणी असेल तो महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा शत्रू मानला पाहिजे. या शत्रूने फडणवीसांना उचलून कडेवर घेऊन नाचवले असेल तर महाराष्ट्राच्या जनतेने हे चित्र मेंदूवर कोरून ठेवले पाहिजे. आज आपल्याकडे सत्ता नाही, पण ती उद्या येणारच नाही असे नाही. राजकारणात चढ-उतार येतच असतात. आंध्रात चंद्राबाबूंची साफ धूळधाण होऊन पाच वर्षांपूर्वी ते जमीनदोस्त झालेच होते, पण आज ते पूर्ण बहुमताने सत्तेवर आलेच व त्यांच्याच कुबड्यांवर मोदी पंतप्रधान झाले. चंद्राबाबू सत्तेवर येताच प्रथम त्यांनी काय केले, तर सत्तेवर नसताना ज्यांनी त्यांच्यावर व त्यांच्या लोकांवर हल्ले केले, अपमानित केले, तेलगू अस्मितेवर हल्ले केले अशा सर्व लोकांना बेदम चोपले. काही जणांचे हात-पायच मुळासकट कापले. हे जे घडले त्याचे रक्तरंजित चित्रमय प्रदर्शन जगन मोहन रेड्डी यांनी दिल्लीच्या जंतर मंतरवर भरवले होते, पण राजकारणात बदला घेण्याचे सूत्र कायम आहे व आता बदला घेण्याची आयुधेही बदलली आहेत. मराठी माणसाला उचलून आणण्याची व
खतम करण्याची भाषा
करणाऱ्यांनी हे ध्यानात घेतले पाहिजे. मुंबईचे रक्त शोषून तुमच्या कमायांचे टॉवर्स वाढले आहेत. त्या मुंबईच्या जमिनीखाली 105 हुतात्म्यांचे प्राण व आत्मे आहेत. ते 105 हुतात्मा झाले म्हणून मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मराठी माणसाच्या श्रमातून, रक्तातून मिळालेल्या मुंबईचे मोल कदाचित ‘कमळा’बाईच्या भक्तांना नसेल, कारण महाराष्ट्राच्या लढ्यात ते कधीच नव्हते, पण असंख्य स्वाभिमानी ‘गजाभाऊ’ तेव्हा होते व आजही आहेत. या अशा असंख्य गजाभाऊंनी लाठ्या खाल्या, तुरुंगवास भोगला, गोळ्या झेलल्या व महाराष्ट्राच्या दुश्मनांना ते पुरून उरले. आज मुंबईत अदानी, लोढा, गुंडेचा, झुंडेचा घुसले व त्यांनी मराठी माणसांची नाकाबंदी सुरू केली. त्यात आता मराठी माणसाला उचलून आणून मारण्याची भाषा सुरू झाली व अशा धमक्या देणारे लोक फडणवीसांच्या अंतस्थ गोटातले आहेत हे दुर्दैव! त्यामुळे मराठी माणसाला अधिक एकजुटीने आणि सावधानतेने राहावे लागेल. तसेच तितक्याच निर्भयपणे ‘हर हर महादेव’चा गजर करावा लागेल. अर्थात बरे झाले, या निमित्ताने भाजपच्या पोटातील मराठीद्वेषाची मळमळ बाहेर पडली. आता त्यांच्याच हाती महाराष्ट्र राज्याची सूत्रे जात आहेत. म्हणून लढा थांबवता येणार नाही. गजाभाऊ, आता काय करणार? ‘मारता मारता मरावे’ या मंत्रास जागून तो लढेल व महाराष्ट्राच्या दुश्मनांना मारेल. फडणवीस, तुम्ही कोणाच्या बाजूने उभे राहणार? गजाभाऊ की तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचणाऱ्या उपऱ्या महाराष्ट्र दुश्मनांच्या बाजूने? एकदाच काय ते सांगून टाका!