राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात ईव्हीएम मशिन्स हॅक करून मतांमध्ये फेरफार केल्याचा संशय महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी व्यक्त केला आहे. यातच आज काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली आहे. या शिष्टमंडळात काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नाना पटोले, ज्येष्ठ नेते अभिषेक मनू सिंघवी आणि इतर महत्त्वाच्या नेत्यांचा समावेश आहे.
यावेळी महाराष्ट्र निवडणूक निकालाची आकडेवारी जाहीर करण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला केली. निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर अभिषेक मनू सिंघवी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, ”निवडणूक आयोगासमोर आम्ही आमचे विचार सविस्तरपणे मांडले आहेत. गंभीर मुद्द्यांवर डेटा प्रसिद्ध करायला हवा होता.”
निवडणूक आयोगासमोर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने तीन महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. याचबद्दल बोलताना माध्यमांशी संवाद साधताना अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितलं की, ”पहिला मुद्दा म्हणजे लाखो लोकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. याबाबत आम्ही आयोगाला सांगितले की, याची सविस्तर माहिती द्यायला हवी, जेणेकरून नावे का व कशी काढली गेली हे कळू शकेल.”
ते म्हणाले, ”दुसरा मुद्दा होता मतदार यादीत नवीन नावे समाविष्ट करणे, कारण लोकसभा निवडणुकीनंतर सुमारे 47 लाख नवीन मतदारांची नावे समाविष्ट गेली आहेत. तिसरा मुद्दा म्हणजे मतदानानंतर मतदानाची टक्केवारी सात टक्क्यांपर्यंत वाढवणे. आम्ही यासाठी डेटा मागितला आहे. कारण सात टक्के मते निवडणुकीचे संपूर्ण गणती बदलू शकते. आणखी एक मुद्दा म्हणजे एकूण 118 विधानसभा मतदारसंघ आहेत, जिथे लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 25 हजार टक्क्यांनी वाढ झाली आहे. यातील बहुतांश भागात भाजप आणि मित्रपक्षांनी बाजी मारली आहे.” आम्हाला आशा आहे की, याचं आम्हाला उत्तर मिळेल, जे पारदर्शक असेल आणि अविश्वास दूर होईल, असंही ते म्हणाले.