गुजरातमध्ये डिटॉक्स इंडिया कंपनीत स्फोट, चार मजुरांचा मृत्यू

गुजरातमध्ये एका कंपनीत भीषण स्फोट होऊन चार मजुरांचा मृत्यू झाला आहे. भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वर जीआयडीसी परिसरातील डिटॉक्स इंडिया कंपनीत मंगळवारी दुपारी ही घटना घडली. कंपनीतील एमई प्लांटमध्ये रासायनिक प्रक्रियेदरम्यान स्टीम प्रेशर पाईप फुटल्याने हा स्फोट झाला.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्यांसह सुरक्षा पथक, आरोग्य विभागाचे पथक आणि स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भरुचच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चार जणांच्या मृत्यूला दुजोरा दिला आहे. पोलीस अपघाताबाबत तपास करत आहेत. सविस्तर तपासानंतरच अपघाताचे नेमके कारण कळेल.