मोदी-अडानी एक है! संसदेच्या पायऱ्यांवर ‘इंडिया’ आघाडीच्या प्रमुख नेत्यांचं आंदोलन, जोरदार घोषणाबाजी

उद्योगपती गौतम अदानी लाचखोरीप्रकरणी सरकारने संसदेत चर्चा करावी तसेच उत्तर प्रदेशमधील संभल येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणीही सरकारने सभागृहात चर्चा करावी अशी मागणी ‘इंडिया’ आघाडीने लावून धरली आहे. याच मुद्द्यावरून संसदेत आणि बाहेरही ‘इंडिया’ आघाडी आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. मंगळवारी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी संसदेच्या पायऱ्यांवर ‘मोदी-अडानी एक है’ असा बॅनर झळकावत आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

मोदी अदानी भाई भाई, देश बेच के खाई मलाई… अदानी के भ्रष्टाचार की जांच करो… नरेंद्र मोदी सदन में आओ, लुटखोरी पे जवाब दो… भ्रष्टाचार पर जवाब दो… कमीशनखोरी बंद करो… अदानी के दलालो की सरकार नही चलेगी नही चलेगी… अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस खासदार प्रियांका गांधी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत, आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांच्यासह इंडिया आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते.

अदानी समूहावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापन करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. याच मुद्द्यावरून मंगळवारी संसदेच्या मकरद्वारासमोर पायऱ्यांवर इंडिया आघाडीने आंदोलन केले. केंद्र सरकार अदानी समूहाला संरक्षण देत असून आर्थिक अनियमिततेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही विरोधकांनी केला.


‘अदानी समूहावर’ होत असलेल्या विविध भ्रष्टाचाराच्या आरोपांवर केंद्र सरकार संसदेत चर्चा होऊ देत नाहीत. ‘इंडिया’ आघाडीतर्फे वारंवार याबाबत सत्ताधाऱ्यांना जाब विचारल्यावर, संसदेतले कामकाज वारंवार तहकूब केले जाते. या विरोधात मंगळवारी इंडिया आघाडीने संसद भवनाबाहेर निदर्शने केले.