EVM मशीनचा पर्दाफाश करणारी बॅलेट पेपर मतदान प्रक्रिया रद्द; पोलिसांच्या दबावतंत्रामुळे मारकडवाडी ग्रामस्थ भयभीत

विधानसभा निवडणुकीत EVM मध्ये घोळ झाला असल्याचा आरोप मारकडवाडी ग्रामस्थांनी केला होता. या घोटाळ्याचा पर्दाफाश करण्यासाठी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबविण्याचे नियोजन केले होते. मात्र पोलिसांनी ही प्रक्रिया आज हाणून पाडली. पोलीस प्रशासनाच्या दबावामुळे आजचे मतदान रद्द केल्याचे जाहीर करीत अन्य मार्गाने न्याय मागू, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर म्हणाले.

विधानसभा निवडणुकीनंतर मारकडवाडी गाव चर्चेत आले असून गावकऱ्यांनी EVM वर आक्षेप घेत पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर मतदान करण्याचा निर्णय घेतला होता. तसा ठराव गावच्या बैठकीत करण्यात आला आणि मतदानाची तारीख 3 डिसेंबर ही निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार आज गावात मतदान केंद्र, मत पत्रिका आदी निवडणुकीची जय्यत करण्यात आली होती.

सकाळी 8 ते 5 यावेळेत ही मतदान प्रक्रिया पार पडणार होती. या मतदान प्रक्रियेला प्रशासनाने सहकार्य करण्याची विनंती ग्रामस्थांनी तहसीलदार यांच्याकडे केली होती. मात्र तहसिलदारांनी ग्रामस्थांची मागणी फेटाळून लावत निवडणूक प्रक्रिया न राबविण्याची सूचना केली होती. पोलीस यंत्रणेने तर गावातील प्रमुख लोकांना नोटीस देऊन मतदान प्रक्रिया थांबविण्याची सूचना केली होती. पोलीस यंत्रणा एवढ्यावरच थांबली नाही त्यांनी गावात 144 हे जमावबंदीचे कलम लागू केले.

आज मंगळवार सकाळी मतदान बूथ उभारणीची लगबग सुरू होती. लोक गावच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर जमू लागले तोच पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात दाखल झाला. सशस्त्र पोलीस गावात दाखल झाल्याने, गावात भीतीचे वातावरण पसरले. पोलिसांनी स्पीकर वरुन गावकऱ्यांना जमावबंदी असल्याच्या सूचना दिल्या. पोलिसांच्या या दमबाजीमुळे लोक घराकडे परतू लागले.

आमदार उत्तम जानकर हे घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. मतदान प्रक्रिया सुरु केली तर कारवाई होणार यावर पोलीस ठाम होते. पोलिसांचा हस्तक्षेप आणि घाबरलेले ग्रामस्थ पाहून आमदार जानकर यांनी मतदान प्रक्रिया स्थगित करण्याचा निर्णय घोषित केला. तत्पूर्वी आमदार जानकर यांनी EVM मशीन बाबत खुलासे केले.

माळशिरस मतदार संघातून मला एक लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळणे अपेक्षित होते. मात्र अवघ्या तेरा हजाराचे मताधिक्य मिळाले आहे. तुतारीला एक मत मिळाल्या नंतर दुसरे मत हे कमळाकडे जात होते असा आमचा संशय आहे. मारकडवाडी या गावातून मी तीन वेळा निवडणुका लढविल्या आहेत. प्रत्येक निवडणुकीत मताधिक्य मिळाले आहे. याच निवडणुकीत मताधिक्य का घटले याचा गावकऱ्यांना संशय आहे. म्हणून दूध का दूध पाणी का पाणी करण्याचा गावकऱ्यांचा इरादा होता. मात्र पोलिसांनी मतदान साहित्य जप्त करू आणि सर्वांवर गुन्हे दाखल करू अशी भूमिका घेतल्याने मतदान प्रक्रिया रद्द करण्यात आली.

माध्यमांशी बोलताना उत्तम जानकर म्हणाले की, आम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा तयारी पूर्ण केली होती. मात्र पोलीस प्रशासनाने एक जरी मतदान झाले मतपेटी, मतपत्रिका आणि इतर साहित्य जप्त करू, तसेच सर्वांवर गुन्हे दाखल करू असे म्हटले. त्यामुळे सर्व ग्रामस्थांशी चर्चा केली. मतदानच करू देणार नसतील तर झटापट, गोंधळ होईल आणि लोक निघून जातील. प्रशासनाच्या भूमिकेमुळे मतदान थांबवण्यात आले असून येत्या 8-10 दिवसात प्रांत कार्यालय किंवा जिथे न्याय मागण्याचे ठिकाण असेल तिथे 25-30 हजार लोकांना आक्रोश पोहोचवण्याचे काम करू. न्याय मिळाल्याशिवाय मी थांबणार नाही.

मारकडवाडीत जे मतदान होते त्यापैकी 1400 मते मला, तर 504 मते समोरच्या उमेदवाराला होणार होते. याबाबत मी सर्व अभ्यास केला होता. मात्र समोरच्या उमेदवाराला 1003 मते दाखवण्यात आली. ईव्हीएममुळे हे झाले असून आम्ही दिलेले मत उत्तम जानकर यांना न होता दुसऱ्याला कसे गेला हा प्रश्न गावकऱ्यांना होता. त्याची पडताळणी करण्यासाठी शासनाने सहकार्याची भूमिका घ्यायला हवी होती. मात्र पोलिसांनी 144 कलम लावत जमावबंदीचे आदेश दिले. तसेच मतदान साहित्य जप्त करण्याचा इशारा दिला. प्रशासनानेच ही भूमिका घेतल्यावर न्याय मागायचा कसा? असा सवाल उत्तम जानकर यांनी केला.