ओडीशामधून एक विचित्र बातमी समोर आली आहे. ओडिशाच्या एका अभिनेत्याने रंगमंचावर जिवंत डुकराचे पोट फाडून असे काही केले की, थेट पोलिसांनी त्याला अटक केले. या घटनेमुळे ओडीशात खळबळ उडाली आहे. सोमवारी विधान सभेतही अभिनेत्याच्या या कृतीचा निषेध करण्यात आला.
ओडिशाच्या गंजाम जिल्ह्यात रामायणातील राक्षसाची भूमिका साकारणाऱ्या 45 वर्षीय बिंबधर गौडा या थिएटर अभिनेत्याने रंगमंचावर जिवंत डुकराचे पोट फाडून त्याचे मांस खाल्ल्याने त्याला अटक केली आहे. या व्यतिरिक्त, हिंजली पोलीस स्टेशन हद्दीतील रालाब गावात 24 नोव्हेंबर रोजी झालेल्या नाटकाच्या आयोजकांपैकी एकाला देखील प्राण्यांवर क्रूरता आणि वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरु लागली आहे.
बेहरामपुरचे प्रभागीय वनअधिकारी सनी खोखर म्हणाले की, आम्ही त्या लोकांचाही शोध घेत आहोत ज्यांनी थिएटरमध्ये साप दाखवले होते. त्यांनाही लवकर अटक करण्यात येईल. पोलिसांनी अटक केलेल्या आयोजकाचे नाव सांगितलेले नाही. राज्य सरकारने गतवर्षी जारी केलेल्या नियमांमध्ये सापांच्या सार्वजनिक प्रदर्शनावर बंदी घातली होती. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर काहींनी या अभिनेत्या खराखुरा अभिनय वाटण्यासाठी त्या प्राण्याला मारले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.