ईव्हीएममध्ये प्रोग्रामिंग शक्य आहे. जगातील प्रगत देशांमध्ये ईव्हीएमवर निवडणुका होत नाहीत. हिंदुस्थानात हट्टाने ईव्हीएमवर निवडणुका घेतल्या जात आहेत. देशातील लोकशाही टिकावी, ही जगातील लोकशाहीप्रेमी नागरिकांची इच्छा आहे. निवडणूक प्रक्रियेबाबत आणि निकालाबाबत सामान्य नागरिकांच्या मनात संशयाचे वातावरण आहे. केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारने जनतेमधील संशय दूर केला पाहिजे, असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
काँग्रेसच्या माजी अध्यक्षा, सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताहाचे उद्घाटन पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, माजी आमदार रवींद्र धंगेकर, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस संजय बालगुडे, माजी नगरसेविका लता राजगुरू, अविनाश बागवे, दत्ता बहिरट, सौरभ अमराळे, सदानंद शेट्टी, कैलास कदम आणि सप्ताहाचे आयोजक प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष मोहन जोशी यावेळी उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, देशातील लोकशाही आणि राज्यघटनेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. देशात लोकशाही आहे का? हा मूलभूत प्रश्न निर्माण झाला आहे. लोकशाही देशात चढ-उतार येतात. मात्र, सध्याचा निकाल आश्चर्यकारक आहे. लोकशाही पद्धतीने निवडणूक घेतली हे सिद्ध करण्याची जबाबदारी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारची आहे. लोकशाहीचा खून झाला तर राज्यघटनेला अर्थ उरणार नाही. सामान्य लोकांचा विश्वास बसेल यासाठी सरकारला प्रयत्न करावे लागतील.
पोस्टल आणि ईव्हीएम मतदानात 15 टक्क्यांची तफावत कशी? शिवसेनेचा निवडणूक आयोगाला सवाल
उल्हासदादा पवार म्हणाले, सत्तेत बसलेले लोक हिंदुस्थानी संस्कृतीचे ठेकेदार नाहीत. सोनिया गांधी यांनी हिंदुस्थानी संस्कृती जपली आहे. राजीव गांधी यांच्या मृत्यूनंतर त्या देश सोडून गेल्या नाहीत. त्यांनी देशाची सेवा केली. आज महात्मा गांधी, पं. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलीन करण्याचा डाव सुरू आहे. त्याविरोधात रस्त्यावर उतरले पाहिजे.
जोशी म्हणाले, 2004 सालापासून सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताह काँग्रेसच्या वतीने साजरा करीत असून, यंदाचे 20 वे वर्ष आहे. देशातील लोकशाही धोक्यात आली आहे. एकतर्फी निकालामुळे अस्वस्थता असली तरी काँग्रेसचा कार्यकर्ता जिवंत आहे. पुढील निवडणुकींना सामोरे जाण्यासाठी तो तयार आहे. सूत्रसंचालन प्रथमेश आबनावे यांनी केले, तर दत्ता बहिरट यांनी आभार मानले.