विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होऊनही सरकारची स्थापना झालेली नाही. पण तरी लगेच एस.टी. महामंडळाने तिकिटांचे दर वाढवून जनतेच्या खिशाला कात्री लावण्याची तयारी सुरू केली आहे. भाजप सरकारने आतापासूनच जनतेला लुटण्याचे काम सुरू केले असून कंत्राटी भरती आणि एसटी भाडेवाढ पाहता हे सरकार लाडक्या बहिणीला 2 हजार 100 रुपये, शेतकऱयांची कर्जमाफी, वीजमाफी, शेतमालाला हमीभाव देईल असे वाटत नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज माध्यमांशी बोलताना केली.
राज्यात जवळपास अडीच लाख सरकारी पदे रिक्त आहेत. विविध विभागांतील मागासवर्गीय पदांचा अनुशेषही भरला नाही. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून दहा दिवस झाले तरी राज्याचे मुख्यमंत्री पद रिक्त आहे. बेरोजगारांची मोठी फौज राज्यात असून लाखो तरुण मुले-मुली नोकरीची अपेक्षेने वाट पहात असताना सरकारने पुन्हा एकदा पंत्राटी भरती सुरू करून सुशिक्षित तरुणांना नोकर भरतीच्या दिलेल्या आश्वासनाला हरताळ फासला आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
कंत्राटी भरतीला विरोध
अमरावती जिल्हा सत्र न्यायालय आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या यवतमाळ जिह्यातील आर्णी विभागीय कार्यालयात कंत्राटी पद्धतीने नोकर भरती होणार आहे. या नोकर भरतीवरून काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेस पक्षाचा पंत्राटी नोकर भरतीला तीव्र विरोध असून ही भरती रद्द करा अन्यथा रस्त्यावर उतरू, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.