महामानवाला शैक्षणिक मानवंदना द्या! वह्या, पेन, पुस्तके देण्याची महामानव प्रतिष्ठानचे आवाहन

आपल्या संपूर्ण आयुष्यात शिक्षणाला महत्त्व देणारे घटनाकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी त्यांना वह्या, पेन, पुस्तकांची शैक्षणिक मानवंदना देऊन अभिवादन करावे, असे आवाहन महामानव प्रतिष्ठान आणि एक वही, एक पेन अभियानचे अध्यक्ष राजू झनके यांनी केले आहे.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. आयुष्याच्या अखेरपर्यंत ते विद्यार्थी म्हणून शिकतच होते. शिक्षणाच्या बळावर त्यांनी अनेक विषयांवर त्यांची ग्रंथसंपदा निर्माण केली. लाखो विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर डॉक्टरेट केलेली आहे. स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला शिक्षणाचा मूलमंत्र दिला होता. त्यामुळे त्यांच्या 6 डिसेंबरच्या महापरिनिर्वाणदिनी हार, फुले, मेणबत्ती अगरबत्ती या नाशवंत वस्तूंऐवजी त्यांना वह्या, पेन, पुस्तके व इतर शैक्षणिक साहित्याने अभिवादन केल्यास तीच त्यांना खऱया अर्थाने मानवंदना ठरेल, असे झनके यांनी म्हटले आहे.

गरजू विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप

दादर चैत्यभूमीवर येताना सोबत शैक्षणिक साहित्य घेऊन यावे. सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर स्मृतीस्थळ चैत्यभूमी या ठिकाणी हे साहित्य महामानव प्रतिष्ठान आणि भारतीय बौद्ध महासभा आयोजित एक वही, एक पेन अभियानच्या स्टॉलवर जमा करावे. जमा झालेले सर्व शैक्षणिक साहित्य समाजातील गोरगरीब, आदिवासी व गरजू विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे. अधिक माहिती तसेच सहभाग नोंदवण्यासाठी 9372343108 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.