
कारवाईसाठी गेलेल्या पालिकेच्या दुय्यम अभियंत्याला धक्काबुक्की केल्याची घटना मालाडच्या मार्वे परिसरात घडली. याप्रकरणी मालवणी पोलिसांनी एका विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार हे मुंबई महापालिकेत दुय्यम अभियंते म्हणून काम करतात. आज सकाळी ते मार्वे रोड येथे गेले. एका मोकळ्या जागेत अनधिकृत गाळा बांधल्याने त्याच्यावर कारवाईसाठी तक्रारदार, मुकादम, चार कामगार तेथे गेले. कारवाई करताना एकाने त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यावर न थांबता त्याने तक्रारदार यांना धक्काबुक्कीदेखील करण्यास सुरुवात केली.
सरकारी कामात अडथळा आणू नये, असे तक्रारदार याने त्याला सांगितले. मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. नोकरी खाऊन घेईन असे म्हणत त्याने वीट स्वतःच्या डोक्यात मारून घेतली. जर येथून गेले नाही तर अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देईन, अशी धमकी दिली. याची माहिती तक्रारदार याने मालवणी पोलिसांना दिली. अभियंत्याने दिलेल्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.