राज्यातील महत्वाच्या घडामोडी

मुंबईचा पारा चढणार; थंडीचा जोर ओसरला

उत्तरेकडील शीतलहरींमुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला होता. मात्र वातावरणात बदल झाल्याने मुंबईचा पारा पुन्हा चढणार आहे. शहर व उपनगरांतील थंडीचा जोर ओसरला आहे. सांताक्रूझमध्ये गेल्या आठवड्यात 15 अंशांची नीचांकी पातळी गाठणारा पारा सोमवारी थेट 20 अंशांवर गेला. पुढील आठवडाभर किमान तापमान चढेच राहणार आहे. किमान तापमान 23 अंशांच्या आसपास तर कमाल तापमान 34 ते 35 अंशांवर जाईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

भावेश भिंडेचा दोषमुक्ततेसाठी अर्ज

घाटकोपर येथील बॅनर दुर्घटनेप्रकरणात जामीन मिळाल्यानंतर आता या प्रकरणातून दोषमुक्त करावे, अशी याचिका या प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिंडे याने सत्र न्यायालयात केली आहे. दुर्घटनेनंतर लोकांमध्ये निर्माण झालेला संताप कमी करण्यासाठी मला या प्रकरणात गोवण्यात आले आहे. तसेच माझ्याविरोधात कोणताही ठोस पुरावा नाही, असा दावा त्याने याचिकेत केला आहे.

पुण्यातील गँगकडून रमेश कदम यांना मारण्याची धमकी

मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांना पुण्यातील कुख्यात गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. माझीही बाबा सिद्दिकीसारखी हत्या होईल, असा संशय व्यक्त करीत त्यांनी आज पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांची भेट घेऊन पोलीस संरक्षणाची मागणी केली. रमेश कदम यांना पुण्यातील कुख्यात गँगस्टर आबा काशीद याच्याकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात आले. विधानसभा निवडणुकीपासून दोन वेळा धमकी आल्याचे रमेश कदम यांनी सांगितले.

व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकी

मालाड येथील इमिटेशन ज्वेलरीच्या व्यापाऱ्याला खंडणीसाठी धमकावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दिंडोशी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे व्यावसायिक असून ते मालाड येथे राहतात. नोव्हेंबर महिन्यात ते घरी होते. तेव्हा त्यांना एकाने फोन केला. इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय सुरू ठेवायचा असल्यास दर महिन्याला खंडणी द्यावी लागेल असे त्यांना सांगितले. जर खंडणी दिली नाही तर तिथे व्यवसाय करता येणार नाही असे सांगून अश्लील भाषेत शिवीगाळ करून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

तरुणीने केली पोलिसांना मारहाण

तरुणीने गस्तीला असलेल्या पोलीस उपनिरीक्षकासह दोन महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना बोरिवली परिसरात घडली. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार महिला बोरिवली पोलीस ठाण्यात कर्तव्यास आहेत. गोराई जेट्टी, गोराई एक जवळ गस्त करताना एक तरुणी मद्यधुंद अवस्थेत बसली होती. विचारणा केल्यावर चिडलेल्या महिलेने पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच नखांनी चेहऱ्यावर दुखापत केली. पोलीस तिची समजूत घालत होते. मात्र ती ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हती. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. तेव्हा रागाच्या भरात तिने पोलिसांना मारहाण केली.

सचिन कुर्मी हत्याकांड प्रकरणात मोक्का

भायखळा येथे एका राजकीय पक्षाचे पदाधिकारी सचिन कुर्मी यांच्या हत्याकांड प्रकरणात गुन्हे शाखेने मोक्का लावला आहे. त्यामुळे या प्रकरणाची पुढील कारवाई मोक्का अन्वये केली जाणार आहे. सचिन कुर्मी रात्री उशिरा परिसरात फिरत असताना तिघांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात सचिन यांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने गुन्हा करून पसार झालेल्या तिघा आरोपींना अटक केली होती. या प्रकरणाची यापुढील कारवाई आता मोक्का अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.