उत्तर प्रदेशमध्ये सध्या महाकुंभ मेळ्याच्या तयारीला वेग आला आहे. यावेळी या कुंभ मेळ्यासाठी स्वतंत्र जिल्ह्याची घोषणा करण्यात आली आहे. या जिल्ह्याचं व्यवस्थापन कुंभ मेळा व्यवस्थापन पदाधिकाऱ्यांकडूनच केलं जाणार आहे. या सोहळ्याला सुमारे 10 लाख भाविक येण्याची शक्यता आहे. यंदा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी 2025 या काळात एकूण 44 दिवस महाकुंभ मेळा प्रयागराज येथे होणार आहे.
तब्बल 12 वर्षांनी एकदा प्रयागराज येथे महाकुंभ मेळा होतो. कोट्यवधी भाविक या कुंभ मेळ्याला हजेरी लावत असतात. त्यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात येत असून या काळात सुरक्षा व्यवस्थेसाठीही चोख बंदोबस्ताच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून पावलं उचलली जात आहेत. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या काळात हा महाकुंभ मेळा होत आहे.
महाकुंभ मेळ्यात शाही स्नानाला मोठं महत्त्व असल्याचं मानलं जातं. प्रयागराज जिल्हा प्रशासनाकडून महा कुंभ मेळ्यात शाही स्नानासाठी महत्त्वाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 13 जानेवारी 2025 – पौष पौर्णिमा, 14 जानेवारी – मकर संक्रात, 29 जानेवारी – मौनी अमावस्या, 3 फेब्रुवारी – वसंत पंचमी, 12 फेब्रुवारी माघी पौर्णिमा आणि 26 फेब्रुवारी – महाशिवरात्र यै शाही स्नानाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत.