दिल्लीसाठी आपला महाराष्ट्र महत्त्वाचा नाही, सत्तास्थापनेच्या विलंबावरून आदित्य ठाकरे यांची टीका

निवडणूक आयोगाने महायुतीवर उपकार केले तर त्यांची सरकार स्थापन करण्याची त्यांची मानसिकता नाही अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. तसेच दिल्लीसाठी महाराष्ट्र महत्त्वाचा नाही असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

एक्स या सोशल मीडियावर पोस्ट करून आदित्य ठाकरे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून, महाराष्ट्रात अजूनही सरकार बनत नाहीये, याची दोनच कारणं असू शकतात. एक निवडणूक आयोगाने उपकार केले असले तरी सरकार बनवायची मानसिकता नाही. महाराष्ट्रच आहे ना… अपमान करूया, सरकार काही दिवसांनी बसवूया, कोण काय बोलणार आहे? ही दुसरी मानसिकता असे आदित्य ठाकरे म्हणाले.

तसेच एवढं संख्याबळ असूनही, महाराष्ट्रात हे अजून सरकार बसवू शकले नाहीत; कारण आपलं महाराष्ट्र राज्य त्यांना महत्वाचं नाहीये. महाराष्ट्राला दुर्लक्षित करा, महाराष्ट्राचा सातत्याने अपमान करा आणि सरकारचं गठन प्रलंबित ठेवा; सध्या त्यांची हीच भूमिका दिसत आहे. बाकी सगळ्या गोष्टी करण्यासाठी यांच्याकडे वेळ आहे पण दिल्लीसाठी आपला महाराष्ट्र, आपलं राज्य महत्वाचं नाहीये, हे आता स्पष्ट दिसत आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.