अकाल तख्तने पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांना सुनावली शिक्षा, शौचालय आणि भांडी साफ करा

वादग्रस्त डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग यांना 2015 मध्ये माफी देण्यासह चुकीचे राजकीय निर्णय घेतल्याबद्दल पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांना शिक्षा सुनावली आहे. शिख समुदायाचे सर्वोच्च धार्मिक संस्था असलेल्या अकाल तख्तने ही शिक्षा सुनावली आहे. अकाल तख्तने बादल यांना अमृतसरच्या सुवर्ण मंदिरातील स्वच्छतागृहे साफ करणे आणि स्वयंपाकघरातील खरकटी भांडी घासण्याचे आदेश दिले आहेत.

अकाल तख्तचे जथेदार ग्यानी रघबीर सिंग आणि इतर चार धर्मगुरूंनी 30 ऑगस्ट रोजी सुखबीर बादल यांना ‘तनखैया’ (धार्मिक गैरवर्तनासाठी दोषी) घोषित केले होते. शिक्षेचा एक भाग म्हणून सुखबीर बादल आणि त्यांच्या 2015 च्या पंजाब मंत्रिमंडळातील नेत्यांना अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात ‘सेवा’ करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये स्वच्छतागृहे साफ करणे, भांडी धुणे आणि त्यांच्या कृत्यांचे प्रायश्चित करण्यासाठी इतर धार्मिक कर्तव्ये स्वीकारणे यांचा समावेश आहे.

सुखबीर बादल यांच्या नेतृत्वाखालील शिरोमणी अकाली दलाला (एसएडी) पक्षप्रमुखपदाचा राजीनामा तीन दिवसांत स्वीकारण्याचे निर्देशही अकाल तख्तने दिले आहेत. या आदेशाचे पालन करून अकाल तख्तला अहवाल देण्याच्या सूचना एसएडीच्या कार्यसमितीला देण्यात आल्या आहेत.