धनंजय चंद्रचूड यांच्याकडून अपेक्षा होत्या, पण त्यांनी लोकशाहीचा गळा घोटला; पृथ्वीराज चव्हाण यांची टीका

prithviraj-chavan

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नुकताच ईव्हीएममध्ये गडबड असल्याचा संशय व्यक्त केला होता. आता त्यांनी माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्यावर टीका केली आहे. माजी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्याकडून आमच्या खूप अपेक्षा होत्या. पण निर्णय न घेतल्याने त्यांनी लोकशाहीचा गळा घोटला, अशी टीका पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. पक्षांतर बंदी कायद्याचा सर्वात मोठा निर्णय होता, तो झाला नाही, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

लोकशाहीचा जर खून झाला तर संविधानाला काही अर्थ राहणार नाही, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. भारतीय लोकशाही बळकट असली पाहिजे असं सर्वांचं मत आहे. प्रत्येकाच्या मनात ईव्हीएमबद्दल शंका आहे. या वर्षाच्या सुरुवातीला मोदींनी निवडणूक आयुक्त नेमण्याचा कायदा बदलला. तक्रार करायची कोणाकडे? निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. पण त्यांच्यावर विश्वास राहिला नाही, असेही ते म्हणाले.

राज्याचे विधानसभा निकाल अनपेक्षित लागले. ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची होती. हरियाणा आणि महाराष्ट्रात जर भाजप विरोधात सत्ता गेली तर केंद्रातील सरकारला धोका होता. या देशात लोकशाही आहे, हे सिद्ध करणं निवडणूक आयोग आणि सरकारची जबाबदारी आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. जनतेच्या मनातील शंका दूर करण्यासाठी 100 टक्के VVPAT ची मोजणी करा. खर्च होईल, काही दिवस लागतील. पण हे करा. तुम्ही जर केलं नाही तर संशय वाढणार आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले.