क्रिकेटप्रेमी आणि नव्या पिढीच्या खेळाडूंसाठी प्रेरणा आणि स्मरणाचे स्थान म्हणून रमाकांत आचरेकर सरांच्या स्मृती स्मारकाची निर्मिती करण्यात येणार आहे. हे स्मारक क्रिकेटची पंढरी छत्रपती शिवाजी महाराज पार्क, गेट क्रमांक 5 येथे बांधण्यात येणार आहे. 3 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते स्मृती स्मारकाचे लोकार्पण होईल.
या सोहळ्याला सरांनी घडवलेले अनेक शिष्य उपस्थित राहणार आहेत. याशिवाय आचरेकर सरांची मुलगी विशाखा दळवी आणि आचरेकर कुटुंबीयही या अविस्मरणीय सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. 2 जानेवारी 2019 साली सरांच्या देहवासनानंतर सरांचे शिष्य आणि सरांच्या कामत क्लबचे माजी कर्णधार सुनील रामचंद्रन (रमणी) यांनी सरांच्या स्मरणार्थ स्मारक असावे, अशी इच्छा व्यक्त केली. पुढील पिढीला हे स्मारक सदैव प्रेरणादायी ठरावं म्हणून त्यांनी ही मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र सरकारला विनंतीही केली होती. त्यामुळे सरकारने त्यांच्या या मागणीची दखल घेऊन शिवाजी महाराज पार्क येथील स्मारकास मान्यता दिली आहे.
द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सर यांचा जन्म 1932 मध्ये झाला होता आणि 2 जानेवारी 2019 रोजी त्यांचे निधन झाले. त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार, श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार आणि ‘अचीव्हमेंट ऑफ अ लाइफटाइम’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
स्मारकाविषयी थोडक्यात माहिती
द्रोणाचार्य रमाकांत आचरेकर सरांचं हे स्मारक शिल्पकार तारकर साकारणार आहेत. तारकर हे जेजे स्कूल ऑफ आर्ट्सचे माजी विद्यार्थी आहेत. रमाकांत आचरेकर (1932 – 2 जानेवारी 2019) हे मराठी क्रिकेट प्रशिक्षक होते. हिंदुस्थानी फलंदाज सचिन तेंडुलकर याचे मार्गदर्शक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. त्यांनी अनेक क्रिकेटर्सना घडवले.
स्मारकाचं स्वरूप
स्मारकात दोन बॅट, चेंडू, हेल्मेट, ग्लोव्हज आणि पॅड असणार आहे. या स्मृती स्मारकाच्या खाली द्रोणाचार्य आचरेकर सरांचं नाव असणार आहे. स्मारकाच्या दोन्ही बॅटवर आचरेकर सरांनी घडवलेले आणि राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या खेळाडूंची सही असणार आहे. छत्रपची शिवाजी महाराज पार्कात होणारं हे स्मारक क्रिकेटप्रेमींसाठी आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे.