मोदी सरकारमधील स्पष्टवक्ते म्हणून ओळख असलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात मोठं विधान केलं. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी गडकरी म्हणाले की ‘राजकारण हा अतृप्त आत्म्यांचा महासागर आहे. इथे नगरसेवकापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सारेच दु:खी आहेत’.
आपल्या भाषणात बोलताना ‘राजकीय क्षेत्र असो की कार्पोरेट असो की अन्य कोणतं क्षेत्र, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा जीवन हे संघर्षानं भरलेलंच असतं. तुमच्याकडे जीवन जगण्याची कला असली पाहिजे. ते महत्त्वाचं’, असं नितीन गडकरी म्हणाले.
गडकरी यांनी यावेळी बोलताना राजस्थानमधील विधिमंडळाच्या एका कार्यक्रमातील किस्सा सांगितला. राजस्थान मध्ये बोलताना ते म्हणाले होते की, ‘राजकारण हा अतृप्त आत्म्यांचा महासागर आहे. तेव्हा लोक असले. इथे प्रत्यकजण दु:खी असतो. जो नगरसेवक बनतो त्याला आमदार बनता आलं नाही म्हणून दु:खी, आमदार दु:खी आहे कारण त्याचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही आणि जो मंत्री बनला तो दु:खी आहे कारण त्याला चांगलं खातं नाही मिळालं, मुख्यमंत्री पद नाही मिळालं. तर मुख्यमंत्री यामुळे टेन्शनमध्ये आहे की हायकमांड कधी ठेवेल आणि कधी काढेल याचा भरवसा नाही…’ गडकरींच्या या विधानानं सभागृहात हशा पिकला.
भाषणाता त्यांनी रिचर्ड निक्सन यांचं त्यांना भावलेलं वाक्यही सांगितलं. निक्सन यांच्या आत्मचरित्रात म्हटलं आहे की ‘युद्धात पराभव झाला म्हणून कुणी संपत नाही. पण तो युद्धातून पळाला किंवा थांबला तर संपतो’.
यासोबतच ते म्हणाले की, ‘सोशल मीडियावरील एक वाक्य मला भावलं. रावणाला ज्ञानाचा अहंकार होता आणि रामाला अहंकाराचं ज्ञान होतं. हे वाक्य छोटं आहे पण त्यामागचं तत्त्वज्ञान मोठं आहे’. या पुढे ते म्हणाले की , ‘पर्स अँड पर्सन तर पर्सन (व्यक्ती) महत्त्वाचा. पर्सन अँड पार्टी तर पार्टी महत्त्वाची. पार्टी अँड फिलोसॉपी तर फिलोसॉफी महत्त्वाची. कारण फिलोसॉफीचा संबंध मानव निर्मितीशी आहे’, असं सांगत त्यांनी व्यक्ती पेक्षा पार्टी आणि पार्टीपेक्षाही विचारांचं महत्त्व अधिक असल्याचं अधोरेखित केलं.