अक्कलकुव्यात मिंधे आणि भाजपा गटात धुमश्चक्री; आमदार पाडवीसह शंभर जणांवर विनयभंग, मारहाणीचा गुन्हा

aamshya-padavi

नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात मिंधे विरुद्ध भाजपा अशी दंगल भडकली आहे. सोरापाडा येथे ग्रामपंचायतीअंतर्गत कामावरून हे गट शुक्रवारी एकमेकांना भिडले. भाजपाच्या पंचायत समिती सदस्याच्या फिर्यादीवरून मिंधे गटाचे आमदार आमश्या पाडवीसह शंभर जणांवर विनयभंगासह मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मारहाणीच्या निषेधार्थ मोलगीत मोर्चा काढून आमदाराविरोधात धरणे धरण्यात आले होते.

अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा येथे शुक्रवारी ग्रामपंचायतीअंतर्गत रस्त्याचे काम सुरू होते. तेथे रस्ता खोदून पेव्हर ब्लॉक बसवा, असे भाजपाचे पंचायत समिती सदस्य सुधीर गंगाराम पाडवी यांनी सांगितले. या कारणावरून सरपंचाचा पती याच्यासह आमदार आमश्या पाडवी व मोठ्या जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. चेतन ओजू पाडवी, अंजू आमश्या पाडवी, जेका सामा पाडवी, विक्की जेका पाडवी, आमदार आमश्या पाडवी, मंगल वीरसिंग पाडवी, शंकर आमश्या पाडवी, तुकाराम बेकळ्या वळवी, सचेंद्र सिंग चंदेलसह ऐंशी ते शंभर जणांनी येवून हल्ला केला. शिवीगाळ, दमदाटी करीत मोबाईल फोडला. सुधीर पाडवी यांच्या कुटुंबातील महिलांसोबत गैरवर्तन केले, अशी फिर्याद सुधीर पाडवी यांनी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दिली. यावरून शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. या मारहाणीत सुधीर पाडवी, अविनाश भरत वळवी आणि दोन महिला जखमी झाले, उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आले आहे. या हल्ल्याच्या निषेधार्थ मोलगी येथे रविवारी आमदार पाडवी यांचा निषेध करीत मोर्चा काढण्यात आला. यात मोठ्या संख्येने महिला सहभागी होत्या.

दरम्यान, रविवारी सरपंच महिलेच्या फिर्यादीवरून सुधीर पाडवी यांच्यासह 80 ते 90 जणांवर अश्लील शब्द उच्चारून मारहाण, जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.