अब की बार आरपार! केंद्राच्या धोरणांविरोधात शेतकरी उतरला रस्त्यावर; नोएडातून दिल्लीच्या दिशेने कूच

केंद्रातील एनडीए सरकाराच्या शेतकऱ्यांसंदर्भातील धोरणांविरोधात संतप्त शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. संयुक्त किसान मोर्चा (SKM) च्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी नोएडाहून दिल्लीच्या दिशेने कूच करत आहेत. हजारो शेतकरी नोएडा येथून दिल्लीतील संसद भवनाकडे मार्च करत आहेत. नवीन कृषी कायद्यांतर्गत नुकसान भरपाई आणि लाभ मिळण्याच्या 5 मागण्यांसाठी शेतकरी आग्रही आहेत. आंदोलक शेतकरी बॅरिकेड्स तोडून नोएडातील दलित प्रेरणा स्थळापासून पुढे निघाले आहेत.

दिल्लीतील संसद भवनात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अशा स्थितीत आंदोलक शेतकऱ्यांना रोखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पोलिसांनी दिल्ली-एनसीआरमध्ये बॅरिकेड्स उभारणे आणि मार्ग वळवणे यासह सुरक्षा उपायांमध्ये वाढ केली आहे.

या आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकरी नेत्यानं एएनआयकडे प्रतिक्रिया दिली की,’…सरकार आणि अधिकाऱ्यांकडे आमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठीचा वेळ दिला आहे…आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही आमच्या घरी परतणार नाही…आम्ही त्यांना आमचे कार्यक्रम आधीच सांगितले आहेत. संध्याकाळपर्यंत त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली नाही, तर आम्ही आमचे कार्यक्रम पुढे जाहीर करू… अब की बार आरपार’.

 

शेतकरी आंदोलनातील महत्त्वाचे मुद्दे:

– महामाया उड्डाणपुलावरून शेतकऱ्यांचा गट दिल्लीच्या दिशेने निघाला आहे. आता पोलीस आणि आंदोलक शेतकरी आमनेसामने आले आहेत.

– नोएडाच्या महामाया उड्डाणपुलाला शेतकऱ्यांनी घेराव घातल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.

– शेतकऱ्यांचे आंदोलन लक्षात घेता दिल्ली सीमेवर चार हजारांहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

– त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

– अनेक शेतकरी नेत्यांना ताब्यात घेण्यात आले.

– नोएडा पोलिसांनी सांगितले की, शेतकऱ्यांना कोणत्याही किंमतीत दिल्लीला जाऊ दिले जाणार नाही.

– आंदोलक शेतकरी भारतीय किसान परिषद (BKP) आणि किसान मजदूर मोर्चा (KMM) आणि संयुक्त किसान मोर्चा (SKM) यासह इतर संलग्न गटांशी संबंधित आहेत. शेतकरी नेते सुखबीर खलिफा यांच्या नेतृत्वाखाली नोएडा येथील महामाया उड्डाणपुलाजवळ दुपारी 12 वाजता हे आंदोलन सुरू झाले.