सीआयएसएफच्या जवानांनी मिंधेंच्या शहरप्रमुखाला चोपले, किरकोळ वादातील अरेरावी भोवली

किरकोळ कारणावरून झालेला वाद दादागिरी करून जास्त ताणून धरल्यामुळे मिंधे गटाच्या खारघर शहरप्रमुखाला सीआयएसएफच्या जवानांनी बेदम चोप दिला. हा प्रकार खारघरमधील सेक्टर 12 मध्ये घडला. याप्रकरणी खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून ते पुढील तपास करीत आहेत.

मिंधे गटाचे खारघर शहरप्रमुख प्रसाद परब आणि त्यांचा भाऊ डॉ. श्रीनाथ आपल्या इनोव्हा गाडीतून खारघर, सेक्टर 12 मधील प्रणाम हॉटेल येथून जात असताना सीआयएसएफच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या बसवरील चालकाने परब यांची गाडी उजव्या बाजूने दाबली. अचानक अंगावर येणारी गाडी परब यांनी कशीबशी सावरली आणि त्यांनी या बसचा पाठलाग केला. त्यांनी पुढे जाऊन बस अडवली आणि चालकाला जाब विचारला. बसचालकाला खाली उतरण्यासाठी दरडावले. किरकोळ वाद परब यांच्याकडून ताणला गेल्यामुळे बसमधून सीआयएसएफचे जवान खाली उतरले आणि त्यांनी परब यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र हा वाद विकोपाला गेल्यानंतर सीआयएसएफच्या जवानांनी परब यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. भर वर्दळीच्या भागात घडलेल्या या प्रकारामुळे रस्त्यावर मोठी गर्दी झाली. या बसमध्ये असलेल्या गरुड नामक जवानाने मध्यस्थी करून कुटुंबीयांना त्यांच्या गाडीत बसवले. याप्रकरणी खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आम्हीपण तक्रार करणार

संबंधित तक्रारदारांमार्फत सीआयएसएफच्या जवानांना भांडणासाठी प्रेरित करण्यात आले. तक्रारदार तरुणाने स्वतः सीआयएसएफच्या जवानांना शिवीगाळ आणि मारहाण केली. आपले कर्तव्य बजावून घरी परतत असताना हा प्रकार घडला. सीआयएसएफला बदनाम करणारा हा प्रकार आहे. आम्हीदेखील याप्रकरणी तक्रार देणार आहोत, अशी प्रतिक्रिया सीआयएसएफ मुंबई एअरपोर्टचे डेप्युटी कमांडर अनुराग यादव यांनी व्यक्त केली आहे.