गिनीमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये मोठा राडा, 100हून अधिक जणांचा मृत्यू

पश्चिम आफ्रिकेतील गिनी देशामधील दुसरे सर्वात मोठे शहर एनजेरेकोरमध्ये एका फुटबॉल सामन्यादरम्यान चाहत्यांमध्ये प्रचंड हाणामारी झाली आहे. चाहते एकमेकांना भिडल्याने 100 हून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक रुग्णालयानी सुत्रांनी याबाबत एएफपीला माहिती दिली.

रविवारी गिनी शहरातील दुसरे सर्वात मोठे शहर एनजेरेकोर मध्ये एका फुटबॉल मॅचदरम्यान चाहत्यांमध्ये प्रचंड हाणामारी झाली आणि शेकडो लोकांचा मृत्यू झाला. एका डॉक्टरांनी नाव न देण्याच्या शर्तीवरुन सांगितले की, रुग्णालयात जिथे नजर पोहोचतेय तिथे मृतदेहांचे ढिगारे दिसत आहेत. अनेक मृतदेह गल्लीबोळात लादीवरच पडलेले आहेत, शवगृहं भरलेली आहेत. आता सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरलही होत आहेत. मात्र व्हायरल व्हिडीओंची अद्याप पुष्टी करण्यात आलेली नाही. व्हिडीओमध्ये मॅचच्या बाहेर रस्त्यावर अंदाधुंद परिस्थिती दिसत आहे. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, संतप्त आंदोलकांनी एनजेरेकोर पोलीस स्टेशनमध्ये तोडफोड करुन आग लावली.

एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ही हाणामारी मॅच रेफरी कडून वादग्रस्त निर्णय दिल्यानंतर सुरु झाली. त्यानंतर चाहते संतापले आणि पुन्हा हिंसाचार सुरु झाला. स्थानीय मीडियानुसार, गिनीचे जुंटा नेता ममादी डौंबौया यांच्या सन्मारार्थ आयोजित स्पर्धेचा भाग होता.