बांगलादेशात हिंदूंचे हाल; हिंदुस्थानात येण्यापासून इस्कॉनच्या 50 सदस्यांना रोखलं

bangladesh-iscon-member

बांगलादेशात दिवसेंदिवस परिस्थिती अधिक गंभीर बनत चालली आहे. अल्पसंख्याक समाजाची परिस्थिती तर अत्यंत दीनवाणी झाली आहे. हिंदूंना मोठ्या भयंकर स्थितीला सामोरे जावे लागत आहे. आता तर हिंदूंना बांगलादेशातून हिंदुस्थानात येण्यास रोखले जात असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार वैध प्रवासी कागदपत्रे असूनही, बांगलादेशच्या सीमा सुरक्षा अधिकाऱ्यांनी इस्कॉन या हिंदू अध्यात्मिक संघटनेच्या डझनभर सदस्यांना हिंदुस्थानात परतण्यापासून रोखलं आहे.

वेगवेगळ्या जिल्ह्यातून जवळपास 54 भाविक हे शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेपर्यंत बेनापोल बॉर्डर क्रॉसिंगवर (सीमा भागात) दाखल झाले. मात्र, बरेच तास त्यांना बसवून ठेवण्यात आलं. त्यांची चौकशी करण्यात आली आणि त्यांना कळवण्यात आलं की त्यांचा प्रवास अधिकृत नाही. पीटीआय या वृत्तसंस्थेने या घटनेसंदर्भात माहिती दिली आहे.

बांगलादेशने ISCON या संघटनेला लक्ष्य केलं असून त्याच्याशी निगडित महत्त्वाचा व्यक्तींना अटक करण्यात आली आणि बँक खाती देखील गोठवल्यात आल्याचे वृत्त आले आहे.

इमिग्रेशन पोलीस अधिकाऱ्यांनी बांगलादेशी वृत्तपत्र डेली स्टारसोबत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे की, उच्च अधिकाऱ्यांकडून ISCON च्या सदस्यांना हिंदुस्थानत प्रवेश करण्यास परवानगी न देण्याच्या सूचना मिळाल्या आहेत.

बेनापोल इमिग्रेशन पोलीस अधिकारी इम्तियाज अहसानुल कादर भुईया यांनी याविषयी स्थानिक वृत्तपत्रांना सविस्तर माहिती दिली आहे. ते म्हणाले की, ‘आम्ही पोलिसांच्या विशेष पथकासोबत बातचित केली आणि त्यांना सीमा ओलांडण्याची परवानगी न देण्याच्या उच्च अधिकाऱ्यांकडून सूचना मिळाल्या आहेत’.

या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे की, हिंदुस्थानातील धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी इस्कॉन सदस्यांकडे वैध पासपोर्ट आणि व्हिसा होता. परंतु या प्रवासासाठी आवश्यक असलेली विशिष्ट सरकारी परवानगी त्यांच्याकडे नव्हती. तशी आवश्यक कागदपत्रे त्यांच्याकडे असल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाहीत’, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

इस्कॉनचे सदस्य असलेल्या सौरभ तपंदर चेली यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, ‘आम्ही हिंदुस्थानात एका धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निघालो होतो पण सरकारी परवानगी नसल्याचे कारण देत इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी आम्हाला रोखले’.

दरम्यान, याआधी इस्कॉनचे माजी सदस्य चिन्मय कृष्ण दास यांना देशद्रोहाच्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. यानंतर बांगलादेशमध्ये इस्कॉनला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. चिन्मय दास यांना जामीन नाकारण्यात आला आणि त्यानंतर तुरुंगात टाकण्यात आले, ज्यामुळे हिंदूंनी आवाज उठवत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. त्यावेळी झालेल्या झटापटीत एका वकिलाचा मृत्यू झाला. या आंदोलनादरम्यान आणखी दोन हिंदू पुजारी – रुद्रप्रोती केसब दास आणि रंगानाथ श्यामा सुंदर दास यांना देखील अटक करण्यात आली. आता बांगलादेशमध्ये इस्कोकनवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, बांगलादेशी उच्च न्यायालयाने या संघटनेवर बंदी घालण्यास नकार दिला.

असे असले तरी बांगलादेशी अधिकाऱ्यांनी चिन्मय कृष्णा दास यांच्यासह इस्कॉनशी संलग्न कंपन्यांचे बँक खाते 30 दिवसांसाठी गोठवण्याचे आदेश दिले आहेत. बांगलादेशात हिंदूंची सर्व प्रकारे कोंडी करण्याचे उद्योग सुरू असल्याचे चित्र आहे.