अखेर हिंदुस्थानची स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने आपल्या 28 महिन्यांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवला. तिने सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीत चीनच्या वु लू यूचा 21-14, 21-16 असा पराभव करत बाजी मारली. तसेच पुरुष एकेरीत हिंदुस्थानच्या लक्ष्य सेनने जेतेपदाचे लक्ष्य सहजगत्या गाठले.
सिंधूला गेली अडीच वर्षे पराभवांनाच सामोरे जावे लागत होते. या वर्षी पॅरिस ऑलिम्पिकमध्येही तिने घोर निराशा केली होती. मात्र आज तिने सय्यद मोदी स्पर्धेत आपल्या 28 महिन्यांच्या अपयशांची मालिका खंडित केली. 2022 मध्ये तिने सिंगापूर ओपनमध्ये आपले अखेरचे जेतेपद पटकावले होते. जागतिक क्रमवारीत 18 व्या स्थानावर असलेल्या सिंधूची गाठ 119 व्या स्थानावर असलेल्या यूशी पडत असल्यामुळे ती जिंकणार, असे संकेत होते आणि तेच खरे ठरले. यूने काहीकाळ सिंधूला चुरशीची लढत दिली. दुसऱया गेममध्ये यू आघाडी घेण्याची स्थिती होती. मात्र सिंधूने त्याच आधी तिचा आक्रमक खेळ केला आणि सामनाच 21-16 असा जिंकत संपवला.
पॅरिस ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठणाऱया लक्ष्य सेनने सिंगापूरच्या जिया हेंग जेसन तेहचा अवघ्या 30 मिनिटांत 21-6, 21-7 असा धुव्वा उडवत बाजी मारली. पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्याने प्रेक्षकांची अक्षरशः घोर निराशा केली. हा सामना अत्यंत एकतर्फी झाला. यात तेह केवळ अंतिम सामन्याची औपचारिकता पूर्ण करायला आल्यासारखाच भासला. तो लक्ष्यचा झंझावाती खेळाला जराही संघर्ष करू शकला नाही. हे लक्ष्यचे पाचवे आंतरराष्ट्रीय जेतेपद ठरले.
मिश्र दुहेरीतही हिंदुस्थानींचाच जलवा
महिला आणि पुरूष एकेरीप्रमाणे महिला दुहेरीतही हिंदुस्थानी खेळाडूंचाच जलवा दिसला. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या दोघींनी चीनच्या बाओ ली जिंग आणि ली कियान की या जोडीचा 40 मिनीटांत 21-18, 21-11 असा पराभव करत यश संपादले. राष्ट्रकुल स्पर्धेत कांस्य जिंकणारा ही जोडी ही स्पर्धा जिंकणारी पहिलीच हिंदुस्थानी जोडी ठरली. 2022 सालच्या स्पर्धेत ही जोडी उपविजेती ठरली होती.