जय शहा आयसीसीचे यंग बॉस, अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली; महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याची ग्वाही

हिंदुस्थान क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शहा यांनी रविवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांची जागा घेत 36 वर्षीय जय शहा आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले. जय शाह यांनी आयसीसीची सूत्रे स्वीकारताच ग्लोबल क्रिकेटचा नवा अध्याय सुरू झाला.

आयसीसीने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. ‘जय शहा यांचा आयसीसी अध्यक्षपदाचा कार्यकाळ सुरू झाल्याने जागतिक क्रिकेटचा नवा अध्याय सुरू झाला आहे. शहा यांनी पदभार स्वीकारताच महिला क्रिकेटला अधिक गती देणे हे आमचे प्राधान्य असल्याची ग्वाही दिली. याचबरोबर क्रिकेटच्या विविध फॉरमॅटला प्रोत्साहन दिले जाईल,’ असेही त्यांनी सांगितले.

शहा पुढे म्हणाले, आयसीसी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संचालक मंडळ आणि सदस्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे. जागतिक क्रिकेटमध्ये प्रचंड क्षमता आहे आणि मी आयसीसी संघ आणि आयसीसीसोबत काम करण्यास उत्सुक आहे. प्रत्येक परिस्थितीत खेळाला नवीन उंचीवर नेण्यासाठी काम करणार आहे. आम्ही 2028च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी तयारी करत आहोत आणि जगभरातील चाहत्यांसाठी क्रिकेटला अधिक आकर्षक बनवण्यासाठी आम्ही काम करत असताना ही एक रोमांचक वेळ आहे. आम्ही त्यांना खेळाशी जोडण्याचा प्रयत्न करू.

आयसीसीचे चेअरमन ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबरला संपला. 2020 पासून ते या पदावर होते. आयसीसीने 20 ऑगस्ट रोजी कळवले होते की, बार्कले तिसरी टर्म घेणार नाहीत. यानंतर नवीन अध्यक्षांसाठी अर्ज मागविण्यात आले. उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्टरपर्यंत होती. मात्र, शहा यांच्याव्यतिरिक्त कोणीही या पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. अशा स्थितीत त्यांची बिनविरोध निवड झाली होती. जय शहा या वर्षी 22 सप्टेंबर रोजी 36 वर्षांचे झाले. ते आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष आहेत. त्यांच्या आधी नियुक्त झालेले सर्व 15 अध्यक्ष हे 55 वर्षांपेक्षा जास्त वयाचे होते. 2006 मध्ये, दक्षिण आफ्रिकेचे पर्सी सन वयाच्या 56व्या वर्षी सर्वात तरुण अध्यक्ष झाले. जय शहा त्यांच्यापेक्षा तब्बल 20 वर्षांनी लहान आहेत.

आयसीसी अध्यक्षपद भूषवणारे पाचवे हिंदुस्थानी

आयसीसीचे अध्यक्षपद भूषवणारे जय शहा हे पाचवे हिंदुस्थानी ठरले आहेत. त्यांच्यापूर्वी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन. श्रीनिवासन आणि शशांक मनोहर हे आयसीसीचे प्रमुख राहिले आहेत. शहा हे आयसीसीचे 16 वे अध्यक्ष असतील.

जय शाह यांची वाटचाल

जय शाह हे 2009 मध्ये सेंट्रल क्रिकेट बोर्ड अहमदाबादच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य बनले. सप्टेंबर 2013 मध्ये ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव झाले. 2015 मध्ये बीसीसीआयच्या वित्त समितीचे सदस्य झाले. 2019 मध्ये प्रथमच बीसीसीआयचे सचिव बनले. त्यानंतर 2022 मध्ये त्यांची पुन्हा बीसीसीआयचे सचिव म्हणून निवड झाली होती. जय शाह 2021 मध्ये आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) अध्यक्ष झाले. जानेवारी 2024 मध्ये त्यांची पुन्हा एसीसी अध्यक्षपदी निवड झाली. 2022 मध्ये त्यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वित्त आणि व्यावसायिक व्यवहार समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यांना ऑलिम्पिक खेळांसाठी आयसीसी ऑलिम्पिक वकि&ंग ग्रुपचे सदस्यदेखील बनवले गेले. शाह यांची यंदा 27 ऑगस्ट रोजी आयसीसी प्रमुख म्हणून निवड झाली