कोकण रेल्वेमार्गावर सुरू असलेली बांद्रा टर्मिनस-मडगाव या गाडीला खेड थांबा वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे खेड-दापोली-मंडणगड या तालुक्यांतील प्रवासी या सेवेपासून वंचित राहिले आहेत. या तीन तालुक्यांतील वाढता भार असताना थांबा वगळून को.रे. प्रवाशांवर अन्याय करण्यात आला असून खेड स्थानकाला थांबा मिळण्याची मागणी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
प्रत्येक वेळी गर्दीचा सामना करणे हे कोकणी प्रवाशाला वारंवार करावे लागत आहेत. त्यात त्यांच्या वाटय़ाला कमी गाडय़ा मिळत असल्याने गेली अनेक वर्षे अन्याय सुरूच आहे. त्यात सुरू झालेली बांद्रा टर्मिनस-मडगाव ही गाडी येथील स्थानकावर थांबत नसल्याने कोकणी प्रवाशांचे हाल होत आहेत.
रेल रोकोचा इशारा
या गाडीला खेड थांबा मिळावा अशी प्रमुख मागणी असून मागणी मान्य न झाल्यास संतप्त प्रवासी व रेल्वे प्रवासी संघटना रेल्वेमार्गावर उतरून रेल रोको करतील, असा इशारा सागवेकर यांनी दिला आहे.