वाहन अपघातात तिघांचा मृत्यू 

शहरात वाहन अपघाताच्या घटनेत अल्पवयीन मुलासह तिघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी समतानगर, बोरिवली आणि नागपाडा पोलीस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

अपघाताची पहिली घटना गुरुवारी सायंकाळी बोरिवली परिसरात घडली. मिरारोड येथे राहणारा साईराज चव्हाण हा एका खासगी बँकेत काम करत होता. गुरुवारी सकाळी तो नेहमीप्रमाणे कामावर निघून गेला. सायंकाळी तो रस्ता ओलांडत होता. तेव्हा त्याला ट्रव्हल्सच्या बसने धडक दिली. त्या धडकेत साईराजचा मृत्यू झाला. या प्रकरणी बोरिवली पोलिसांनी ट्रव्हलचा चालकाला अटक केली. दुसरीकडे कांदिवलीच्या हनुमान नगरमध्ये डंपरच्या धडकेत इर्शाद नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला. तिसरी घटना शनिवारी रात्री आग्रीपाडा येथे जाणाऱया वाय ब्रिजवर घडली. मृत हुध अन्सारीच्या आईच्या छातीत दुखू लागल्याने तिला आग्रीपाडा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. हुध हा त्याच्या नातेवाइकासोबत तेथे आला होता. येथून दुचाकीवरून घरी जात असताना झालेल्या अपघातात   हुधचा मृत्यू झाला.