पाकीट चोरीच्या संशयावरून केली हत्या

पाकीट चोरीच्या संशयावरून मित्राने मित्राची हत्या केल्याची घटना विक्रोळी परिसरात घडली. बळीराम चौहान असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी एकाला पार्कसाईट पोलिसांनी अटक केली. संगतीराव चौहान असे त्याचे नाव आहे. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले होते.

रामउग्रह चौहान हा मृत बळीरामचा भाऊ आहे. ते दोघेही हमालीचे काम करतात. संगतीराव हा कचरा वेचण्याचे काम करतो. तो बळीरामच्या परिचित आहे. ते दोघे रात्रीच्या वेळेस दारू पिण्यास बसायचे. काही दिवसांपूर्वी बळीरामचे पाकीट चोरीला गेले होते. ते पाकीट संगतीरावने चोरी केल्याच्या संशयावरून त्याला दोन वेळेस मारहाण केली होती. शनिवारी दुपारी दीड वाजता ते दोघेही न्यू लूक वाईन शॉप परिसरात आले. तेव्हा पाकीट चोरीच्या वादातून त्यांच्यात पुन्हा भांडण झाले.

वादानंतर बळीरामने त्याला मारहाण केली. त्याचा राग आल्याने संगतीरावने त्याच्याकडील चाकूने बळीरामवर वार केले. त्यात बळीराम जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच पार्कसाईट पोलीस घटनास्थळी आले.