गिरगावात आग; बंगला खाक

गिरगावमधील सी. पी. टँकजवळ एका बंद बंगल्याला संध्याकाळी मोठी आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळावर धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, या आगीचे कारण समजू शकलेले नाही.

सी. पी. टँकजवळ असलेल्या एका बंद बंगल्याला संध्याकाळी साडेपाच वाजता आग लागली. बंगला बंद असल्यामुळे सुदैवाने त्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाने तत्काळ धाव घेतली आणि अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र आगीत संपूर्ण बंगला जळून खाक झाला. आगीबाबत अग्निशमन दल आणि पोलीस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, चार दिवसांपूर्वी डोंगरीतील 24 मजली टॉवरला आग लागली होती. त्यात कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी इमारतीचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.