पाऊस गेल्यानंतर टेरवच्या जंगलात धगधगणाऱया अवैध कोळसा भट्टय़ा, सावर्डे परिसरातील कात फॅक्टरींवर नाशिक वन विभागाच्या दक्षता पथकाने टाकलेल्या धाडी यावरून वारंवार अपयशी ठरणाऱया जिल्हा वन विभागाला आता पर्यावरणप्रेमींसह नागरिकांनी लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटू लागले असून केवळ वृक्षतोड आणि वाहतूक परवाना यामध्ये अडकलेल्या अधिकाऱयांमुळे जिह्यातील वन विभागाचे कार्यालयच बंद करा, असा संतप्त सूर उमटत आहे.
गेल्या ऑक्टोबर महिन्यात सावर्डेत दहशतविरोधी पथकाने धाड टाकून 6 जणांना ताब्यात घेतल्याने जिह्यात खळबळ उडाली. कर्नाटक राज्यातून चोरटय़ा मार्गाने 10 लाख रुपयांचे खैराचे लाकूड आणून ते सावर्डे येथील एका ठिकाणी बेकायदेशीररीत्या साठवून ठेवल्याप्रकरणी स्थानिकांसह इतर पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एका संशयित आरोपीचा संबंध इसिस या दहशतवादी संस्थेसोबत काम करणाऱया एका व्यक्तीशी असल्याचा संशय व्यक्त केला गेला. खैर झाडाच्या लाकडाच्या बेकायदेशीर विक्रीतून मिळालेला हा पैसा दहशतवादी कामासाठी वापरला जात असल्याची शक्यता असल्याने दहशतवादविरोधी पथकाने ही कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
नाशिक विभागाकडून मालकांना समन्स
नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या खैर तस्करीचा तपास करताना त्याची पाळेमुळे चिपळूणच्या सावर्डेपर्यंत पसरल्याचे चौकशी पथकाच्या समोर आल्यानंतर नाशिक वन विभागाच्या दक्षता पथकाच्या 16 अधिकारी, कर्मचाऱयांनी सावर्डे परिसरात कात तयार करणाऱया 3 फॅक्टरींवर धाड टाकली. या धाडीत फॅक्टरीमध्ये मोठय़ा प्रमाणात अवैध खैर साठा केल्याचे निदर्शनास आल्याने एका फॅक्टरीला सील ठोकले. त्याची वाहतूक पासेससह अन्य कागदपत्रे, टॅबसह लाखो रुपयांचा अवैध खैर साठा जप्त केला. तीनही ठिकाणी मालक उपस्थित नसल्याने नाशिक वन विभागाने या मालकांना समन्स बजावले आहे.
कोळसा भट्टय़ांना अधिकाऱ्यांचा आशीर्वाद
संपूर्ण कोकणात कोळसा भट्टय़ांवर उच्च न्यायालयानेच बंदी घातली आहे. तरीही पावसाळा सोडला तर ठिकठिकाणी जंगलात कोळसा भट्टय़ा धगधगतात. अर्थात वन विभागाकडे स्थानिक ग्रामस्थ तक्रार करत असतानाही कारवाई मात्र केली जात नाही. त्यामुळे या कोळसा भट्टय़ांना वन विभागाच्या अधिकाऱयांचा आशीर्वाद असल्याचा आरोप खुलेआमपणे केला जात आहे. चार दिवसांपूर्वी टेरव ग्रामस्थांनी या कोळसा भट्टांचे फोटो आणि कारवाई करण्यासाठीचे निवेदन येथील वन विभागाला दिले आहे. कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशाराही दिला आहे.