मालाड येथील स्मशानभूमीमध्ये लहान आकाराच्या मृत प्राण्यांच्या दहनासाठी सुरू असलेली दहनवाहिनी देखभालीच्या कामासाठी तीन आठवडे बंद ठेवण्यात येणार आहे. ही दहनवाहिनी 2 ते 23 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. यादरम्यान एखाद्या प्राण्याचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्याच्यावर परळ येथील खासगी संस्थेत (बैल घोडा) अंत्यसंस्कार केले जाऊ शकतात, अशी माहिती पशुवैद्यकीय आरोग्य विभागाचे महाव्यवस्थापक कलीमपाशा पठाण यांनी दिली.
मालाड येथील स्मशानभूमीत अंदाजे 50 किलो वजनापेक्षा कमी वजनाच्या मृत प्राण्यांचे दहन करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने मालाड येथील स्मशानभूमीमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मृत प्राण्यांचे दहन करण्यासाठी नोंदणी करण्याच्या उद्देशाने https://vhd.mcgm.gov.in/incineration-booking ही लिंकही उपलब्ध करून देण्यात आली आहे. या लिंकवर नोंदणी करून निवडलेल्या विहीत वेळेत मालाड येथील स्मशानभूमीमध्ये मृत प्राण्याचे अंत्यविधी करता येतात, मात्र या दहनवाहिनीच्या देखभाल कामासाठी 2 ते 23 डिसेंबरपर्यंत ही सुविधा बंद ठेवण्यात येणार आहे. देखभालीची कामे पूर्ण झाल्यानंतर ही सुविधा पूर्ववत सुरू करण्यात येईल, असे कलीमपाशा पठाण यांनी सांगितले.