भविष्य निधी सेवानिवृत्त कर्मचारी कल्याणकारी संघटनेची 27 वी सर्वसाधारण सभा दादरच्या अमर हिंद मंडळाच्या सभागृहात झाली. प्रमुख पाहुणे म्हणून वांद्रे विभागीय आयुक्त मोहम्मद अशरफ कामिल, वांद्रे विभागीय केंद्रीय आयुक्त रणवीर सिंह, सहविशेष प्रवक्ता म्हणून अँड. विशाल शिर्के उपस्थित होते. सरचिटणीस जनार्दन नारकर यांनी 2023-24 मधील संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला.
संघटनेचे अध्यक्ष गोवर्धन जिल्ला यांनी सदस्यांना भेडसावणाऱ्या समस्या, वैद्यकीय सहाय्य मिळवताना येणाऱया अडचणी आणि वर्षभरात आयुक्तांसोबत झालेल्या बैठकींचे विवरण सभागृहाला दिले. या सभेत दोन्ही आयुक्तांनी संस्थेच्या कार्याचा विशेष गौरव करीत पेन्शनर सदस्यांचा प्रलंबित वैद्यकीय व नुकतीच 30 जूनच्या सेवानिवृत्तांना त्यांचे सुधारित पेन्शन मिळणेसंदर्भात त्वरित लक्ष घालण्याचे आश्वासन देत संस्थेला या पुढेही सहकार्य करण्याचे मान्य केले. विशाल शिर्के यांनी पेन्शनरना त्यांचे हक्क संरक्षणासंदर्भात मार्गदर्शन करत सध्या केंद्र सरकारकडून अग्रीम पेन्शनची 15 वर्षांची अन्यायकारक वसुलीचा कालावधी हा 12 वर्षांपर्यंत कमी करण्यासाठी काय उपाययोजना यासंदर्भात उपयुक्त माहिती व हा अन्यायकारक कालावधी कमी करून घेण्यासाठी सर्व सदस्यांनी एकत्र येत संघटनेच्या माध्यमातून कसे प्रयत्न करू शकतात या विषयावर मार्गदर्शन केले. सभेत वयाची 75 पूर्ण केलेल्या सदस्यांचा विशेष गौरवासह स्वेच्छानिवृत्ती घेत विविध व्यवसायाच्या वाटांवर आपल्या स्वकर्तृत्वाचा ठसा उमठवणारे जनार्दन बोत्रे, विजयानंद सावंत व राकेश आचार्य यांचा सत्कार करण्यात आला. सभेचे सूत्रसंचालन अरुण रोडे तर समारोप उपाध्यक्ष लवू काजरेकर यांनी केले.