विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध काम केल्याबद्दल काँग्रेसने डझनभर पदाधिकाऱयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यात अखिल भारतीय काँग्रेस समितीचा सदस्य सूरज सिंह ठाकूर यांचाही समावेश आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल पक्षातून निलंबित का करू नये याबाबत सात दिवसांत लेखी खुलासा करण्याचे निर्देश या पदाधिकाऱयांना देण्यात आले आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला अपेक्षित जागा मिळू शकल्या नाहीत. काही पदाधिकाऱयांनी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांविरोधात काम करून सत्ताधारी पक्षांना फायदा करून दिला असे आरोप होत आहेत. काँग्रेसने या प्रकरणांची गंभीर दखल घेतली आहे.
अखिल भारतीय काँग्रेस समितीचे कार्यकारिणी सदस्य आणि प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यांना चांदिवली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली होती. सूरज सिंह ठाकूर तसेच चंद्रेश दुबे या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात काम केले होते. त्यासंदर्भात नसीम खान यांचे मुख्य निवडणूक प्रतिनिधी गणेश चौहान यांनी काँग्रेस प्रदेश कार्यालयाकडे तक्रार केली होती.
वर्षभरात दुसऱ्यांदा नोटीस
या तक्रारीवरून काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या आदेशावरून व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून सूरज सिंह आणि चंद्रेश दुबे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. सूरज सिंह ठाकूर यांच्यावर अशी कारवाई दुसऱयांदा होत आहे. सहा महिन्यांपूर्वी काँग्रेसच्या एनएसयूआय संघटनेचे मुंबई अध्यक्ष असताना कांदिवली येथे आयोजित संघटनेच्या कार्यक्रमात सूरज सिंह यांनी मद्यधुंद अवस्थेत नग्न नृत्य केले होते. त्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.