निवडणुका झाल्या… ‘लाल परी’चा प्रवास महागणार, एसटीचा भाडेवाढीचा प्रस्ताव

राज्यात भाजपचे नवे सरकार आल्यानंतर लोकांना आता वेगवेगळ्या तऱहेने महागाईला सामोरे जावे लागणार आहे. ‘गाव तिथे एसटी’ हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱया राज्य परिवहन महामंडळाने लाल परीच्या भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे.

एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या प्रशासनाकडून 14.3 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. म्हणजेच 100 रुपयांच्या तिकिटांमागे 15 रुपये जास्त द्यावे लागणार आहेत.

14.3 टक्के वाढीचा प्रस्ताव

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीने महिलांना एसटीतून अर्ध्या भाडय़ात प्रवास करण्याची सवलत दिली. आता नवीन सरकार अस्तित्वात येताच त्यांच्यासमोर एसटीच्या भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे. 14.3 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव महामंडळ प्रशासनाने तयार केला आहे. याआधी 27 नोव्हेंबर 2021 रोजी एसटीच्या तिकीट दरात वाढ झाली होती.