मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात महामार्गावर भोगाव हद्दीत गर्डर टाकण्याचे काम सुरू असल्याने महामार्ग प्रशासन व एल अँड टी प्रशासनाकडून कशेडी बोगद्यातील वाहतूक मागील शनिवारपासून बंद करण्यात आली होती. मात्र आता बोगदा पुन्हा सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांना दिलासा मिळाला आहे.
कशेडी बोगद्यामार्गे जाणाऱया नवीन मार्गावर गर्डर टाकण्याचे काम सुरू असल्याने वाहतूक जुन्या मार्गावरून कशेडी बंगल्यामार्गे वळवून चालू करण्यात आली होती. मात्र या मार्गावरील एका मार्गिकेचे गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाल्याने कशेडी बोगदा सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आला असल्याची माहिती कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल शंकर कुंभार व रामागडे यांनी दिली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा या नवीन मार्गावरून एसटीसह ट्रक, टेम्पो, कारसह अवजड वाहनांची वाहतूक सुरू करण्यात आली आहे. कशेडी बोगद्यामार्गे वाहतूक सुरू झाल्याने वेळेसह इंधनाची बचत होऊन प्रवासही सुसाट होत असल्याने सर्वच वाहन चालक या मार्गाने जाणे पसंत करतात. त्यामुळे जुन्या महामार्गावरील रहदारी कमी झाली आहे.