अब्दुल सत्तारांच्या अडचणीत वाढ; निवडणूक अधिकाऱ्याला हाताशी धरत निकाल फिरवल्याचा आरोप; याचिका दाखल

विधानसभा निवडणुकीत सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे अब्दुल सत्तार हे 2420 मतांनी निवडून आले. मात्र, त्यांच्या या विजयावर शंका उपस्थित केली जात असून, निवडणूक अधिकाऱयाला हाताशी धरून सत्तार यांनी निकाल फिरवल्याचा आरोप करून याचिका दाखल केली आहे. त्यावरून खंडपीठाने गृह विभागाला नोटीस बजावली आहे. या घटनेने अब्दुल सत्तार चांगलेच अडचणीत येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अब्दुल सत्तार यांनी निवडणूक शपथपत्रात खोटी व चुकीची माहिती देऊन निवडणूक विभागाची दिशाभूल केल्याचा आरोप करत सिल्लोड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात त्यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे. तसेच सीआयडी चौकशीनंतरही अब्दुल सत्तार यांच्या विरोधात कारवाई करण्यास विलंब केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर येथील खंडपीठाने राज्याच्या गृह विभागाला नोटीस बजावली आहे. या संदर्भात 12 डिसेंबरपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश खंडपीठाने दिले आहेत.

न्यायालयात याचिका दाखल झाल्याने आता अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार की नाही हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चार दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती येथील खंडपीठाने अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड सोयगयाव मतदारसंघात तब्बल साडे पाचशे कोटी रुपयांच्या भराडी निम्न प्रकल्पाला स्थगिती दिली आहे. त्यातच आता 2011 ते 2019 या काळात अब्दुल सत्तार यांनी आमदार निधीचा गैरवापर करत स्वतŠच्या संस्थेच्या शाळा खोल्या बांधल्याच्या प्रकरणी कारवाईस विलंब का? अशी विचारणा करणारी नोटीस देखील खंडपीठाने गृह विभागाला दिली आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांच्यात अडचणीत चांगलीच वाढ होत असल्याचे दिसत आहे.

सुरेश बनकर यांनी काढला आभार दौरा

विधानसभा निवडणुकीचा निकाल देखील जाहीर झाला आहे. महायुती पुन्हा एकदा सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली करत असताना सत्तारदेखील मुंबईत तळ ठोकून आहेत. मात्र, त्यांच्या मतदारसंघात त्यांच्याविरोधात आरोप दाखल केले जात आहेत. तसेच महाविकास आघाडीचे पराभूत उमेदवार सुरेश बनकर यांनी त्यांचा आभार दौरा काढला असून यात त्यांनी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात मोट बांधण्यास सुरू केली आहे.