कडाक्याच्या थंडीमुळे भाजीपाला कडाडला, शेवगा 500 रुपये किलो तर कढीपत्ता 100 रुपये किलो

कडाक्याच्या थंडीमुळे आवक घटल्याने भाजीपाल्याचे भाव कडाडल्याचे चित्र आहे. 60 ते 70 रुपयांना मिळणारी शेवग्याची शेंग तब्बल 400 ते 500 रुपये किलोने मिळत आहे. 60 रुपयांनी मिळणारी मिरची 80 रुपये किलोने तर 40 रुपयांनी मिळणारा कढीपत्ता 100 रुपयांना मिळत आहे. दरम्यान, लसणाची फोडणीही महागली असून लसूण तब्बल 500 रुपये किलोने मिळत आहे. त्यामुळे गृहिणींच्या किचनचे बजेट कोलमडले आहे.

घाऊक बाजारात आले 100 रुपये किलोने विकले जात आहे. किरकोळ बाजारात कांदा 80 रुपये किलोने विकला जात आहे. पेट्रोलचे दरही गगनाला भिडल्याने वाहतूक खर्चही वाढला आहे. त्यात थंडीचा हंगाम सुरू झाल्याने या हवामानाचा फटका भाजीपाला उत्पादनाला बसला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र चाट बसत असल्याचे चित्र आहे.

सांबार महागणार

घेवडा, हिरवी मिरची, मटार, गवार, फरसबी इत्यादी भाज्यांनी शंभरी ओलांडली आहे. बटाटाही महागला आहे. त्यात आता शेवग्याच्या शेंगा 500 रुपये किलोवर गेल्यामुळे सांबर महागणार आहे. परिणामी हॉटेलिंग महागणार असून शेवग्याच्या शेंगांचा वापर करण्यात येणाऱया विविध डिशेस महागण्याची शक्यता आहे.

तुरीलाही मोठा फटका, दर कडाडणार

थंडीचा जोर वाढल्यामुळे ऐन बहरात आलेल्या तुरीलाही मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. धाराशीव जिह्यात तुरीवर अळ्यांचा प्रादुर्भाव होत असल्याचे दिसत आहे. धुक्याचेही प्रमाण अधिक असल्याने किडीचा प्रादुर्भाव आणखी वाढू शकतो. पाऊस चांगला झाल्याने बळीराजाने तुरीची पेरणी मोठय़ा प्रमाणावर केली. पुरेशा पावसाअभावी दोन ते तीन वर्षांत खरीप आणि रब्बी पिकांना फटका बसला होता.

16 रुपयांनी सिलिंडर महागला

देशभरात आजपासून 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात 16.5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे हॉटेलिंग आणखी महागणार आहे. आता दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलिंडर 1818.50 रुपयांना मिळणार आहे. याआधी ही किंमत 1802 इतकी होती. तर मुंबईतही कालपर्यंत 1754.50 रुपयांना मिळणारा गॅस सिलिंडर आता 1771 रुपयांना मिळणार आहे.